धुमाळ पॉईंट जवळील घटनेत मोबाईल चोरटे जेरबंद
नाशिक : दिवाळीच्या खरेदीसाठी जमलेल्या गर्दीत खिशातील मोबाईल हातोहात लांबवणा-या दोघा चोरट्यांना पोलीसांनी बेड्या ठोकल्या असून, त्यांच्याकडून दोन मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेंद्र रामकृष्ण साळवे व रोहित दत्ता साळवे (रा. दोघे कुमावतनगर,पेठरोड) अशी संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी वाडिव-हे येथील साधना संदिप जयस्वाल यांनी तक्रार दाखल केली आहे. जयस्वाल रविवारी (दि.८) दिवाळीच्या खरेदीसाठी शहरात आल्या होत्या. धुमाळ पॉईंट येथील सुदर्शन गारमेंट येथून त्या गर्दीतून जात असतांना ही घटना घडली होती. संशयीतांनी गर्दीची संधी साधत त्यांच्या जॅकिटच्या खिशातील मोबाईल हातोहात लांबवला होता. याप्रकरणी तक्रार प्राप्त होताच पोलीसांनी दोघा चोरट्यांना हुडकून काढले .अधिक तपास पोलीस नाईक लोंढे करीत आहेत.
….
दामोधर सिनेमागृहासमोर महिलेची पर्स लांबवणारा चोर फरार
नाशिक : दिवाळी निमित्त बाजारपेठेत गर्दी झाल्याने चोरटे सतर्क झाले असून, शुक्रवारी (दि.६) चोरट्यांनी महिलेच्या पिशवीतील पर्स हातोहात लांबविली. या पर्स मध्ये रोकडसह दागिणे असा सुमारे ४३ हजाराचा ऐवज होता. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारती अनिल मेतकर (रा.श्रमिकनगर,सातपूर) यांनी तक्रार दाखल केली आहे. मेतकर या शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास खरेदीसाठी शहरात आल्या होत्या. दामोधर सिनेमागृहा समोर त्या खरेदी करीत असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पिशवीतील पर्स चोरून नेली. पर्स मध्ये रोकड आणि सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ४३ हजाराचा ऐवज होता. अधिक तपास पोलीस नाईक गवारे करीत आहेत.
…..
अपघातानंतर टोळक्याची दहशत
नाशिक : दोन दुचाकींच्या अपघातानंतर टोळक्याने दहशत निर्माण करीत दुचाकीस्वारास मारहाण करीत लुटल्याची घटना औद्योगीक वसाहतीत घडली. या घटनेत दुचाकी पेटविण्यात आली असून याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संकेत शिवाजी कासार (रा.वासाळीगाव,महिरावणी,गंगापूर रोड) या युवकाने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. कासार शनिवारी (दि.७) औद्योगीक वसाहतीतील कार्बन नाका ते एबीबी कंपनी दरम्यान आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना ही घटना घडली. रॉंग साईडने आलेल्या अज्ञात अॅक्टीव्हा चालकाने कासार यांच्या दुचाकीस धडक दिली. यावेळी कासार आपली दुचाकी उचलत असतांना पंकज नामक युवकासह त्याच्या सात ते आठ साथीदारांनी भरपाईची मागणी करीत कासार यांना बेदम मारहाण केली. यावेळी संशयीतांनी दहशत निर्माण करीत एका सुमो वाहनाची काच फोडून दुचाकी पेटवून दिली. तर टोळक्याने कासार यांच समवेत अलेल्या कातकाडे व नागरे यांच्या खिशातील मोबाईल आणि सोन्याची अंगठी बळजबरीने काढून घेत पोबारा केला.अधिक तपास उपनिरीक्षक राठोड करीत आहेत.
…..
तडिपार गुंड जेरबंद
नाशिक : हद्दपारीची कारवाई केलेली असतांना शहरात वावर ठेवणा-या तडिपार गुंडास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. ही कारवाई नागसेननगर भागात करण्यात आली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुस्तकीन उर्फ मुज्जा रहिम खान (२९ रा.नागसेननगर) असे अटक करण्यात आलेल्या तडिपाराचे नाव आहे. मुज्जा खान याच्याविरूध्द भद्रकालीसह विविध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असल्याने त्यास शहर पोलीसांनी तडिपार केले आहे. शहर आणि जिह्यातून त्यास हद्दपार केलेले असतांना त्याचा वावर शहरातच असल्याचे या कारवाईतून पुढे आले आहे. मुंबईनाका पोलीस रविवारी (दि.८) नागसेननगर भागात गस्त घालत असतांना तो पोलीसांच्या हाती लागला असून याप्रकरणी पोलीस शिपाई युवराज गायकवाड यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक पवार करीत आहेत.
…
सलून व्यावसायीकाकडून कात्रीने हल्ला
नाशिक : मागील भांडणाची कुरापत काढून सलून व्यावसायीक बंधूनी तरूणावर कातरीने हल्ला केल्याची घटना कोनार्क नगर भागात घडली. या घटनेत तरूण जखमी झाला असून, त्याच्यावर मेडिकल कॉलेज येथे उपचार सुरू आहेत. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आकाश देविदास वाघ आणि निलेश देविदास वाघ (रा.कोनार्क नगर) अशी तरूणावर कातरीने हल्ला करणा-या सलून व्यावसायीकांची नावे आहेत. या घटनेत किरण शांताराम रिकामे (रा.चंद्रगुप्त अपा.पंचकृष्ण लॉन्सजवळ कोनार्कनगर) असे जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. किरण रिकामे शनिवारी (दि.७) सकाळच्या सुमारास गणेश मार्केट कडे जाणा-या मार्गावरील मुक्ताई मेडिकल स्टोअर्स येथे औषधे घेण्यासाठी गेला होता. या वेळी मातोश्री अपार्टमेंट समोरील संशयीत सलून व्यावसायीक वाघ बंधूनी त्यास आवाज देवून आपल्या दुकानात बोलावले. यावेळी संशयीतांनी किरण याच्याशी मागील भांडणाची कुरापत काढून हा हल्ला केला. संतप्त संशयीतांनी आपल्या दुकानातील धारदार कातरीने किरणवर वार केले. या घटनेत किरण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर आडगाव येथील मेडिकल कॉलेज येथे उपचार सुरू आहेत. अधिक तपास उपनिरीक्षक एस.बी.पवार करीत आहेत.