नाशिक – धारदारशस्त्र बाळगणा-या तीन जणांना वेगवेगळया भागात ताब्यात घेतले असून त्यांना अटक करण्यात आली आहे. संशयीतांमध्ये औद्योगीक वसाहतीत राहणा-या दोघा भावांचा समावेश असून ते वेगवेगळय़ा ठिकाणी दहशत माजवित होते. याप्रकरणी अंबड आणि पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ऋषीकेश अशोक राजगिरे (२०),उध्दव अशोक राजगिरे (२१ रा.बि.नं.४ चुचाळे घरकुल योजना) व सागर विश्वनाथ शेजवळ (१९ रा.घोड्याच्या तबेल्याजवळ,गिते चाळ,उदय कॉलनी म.बादरोड) अशी धारदार शस्त्रे बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत. शहर पोलीसांनी गेल्या महिन्यात राबविलेल्या कोम्बींग आॅपरेशन मध्ये मोठ्या प्रमाणात धारदार शस्त्राचा साठा मिळून आला होता. यापार्श्वभूमीवर गुन्हेगारांना पोलीसांनी आपल्या रडारवर घेतले असून धारदार शस्त्र बाळगणा-यांवर कारवाई करण्यात येत आहे. ऋषीकेश राजगिरे हा बुधवारी (दि.२) रात्री महामार्गावरील एक्स्लो पॉईंट भागात दहशत माजवित असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. पोलीसांनी धाव घेत त्यास बेड्या ठोकल्या असता त्याच्या अंगझडतीत धारदार कोयता मिळून आला. याप्रकरणी पोलिस शिपाई नितीन सानप यांच्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार सोनवणे करीत आहेत. तर उध्दव राजगिरे यास सिडकोत बेड्या ठोकण्यात आल्या. दिव्या अॅड लॅब परिसरात तो बुधवारी रात्री धारदार शस्त्र घेवून फिरत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी धाव घेवून त्यास ताब्यात घेतले असता अंगझडतीत त्याच्या कडे धारदार तलवार मिळून आली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई तुळशिराम जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक निकम करीत आहेत. तर सागर शेजवळ हा आपल्या घराजवळील तबेला भागात धारदार शस्त्र बाळगतांना मिळून आला. शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकास त्याच्या कडे धारदार शस्त्र असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने त्यास गाठून चौकशी केली असता त्याच्या ताब्यात धारदार तलवार आणि कुकरी मिळून आली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात युनिटचे कर्मचारी महेश साळुंखे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शस्त्रबंदी आदेशाचे उलंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार डी.व्ही.पाटील करीत आहेत.