नाशिक : शहरात विनयभंगाच्या घटना सुरूच असून नुत्याच वेगवेगळ्या ठिकाणी दोन घटना घडल्या. अल्पवयीन मुलीचा रस्ता अडवून एकाने लग्नाची गळ घालत तिचा विनयभंग केला. तर नव्याने सुरू असलेल्या बांधकाम साईटवर घरात झोपलेल्या महिलेचा गवंड्याने विनयभंग केला. याप्रकरणी मुंबईनाका आणि म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गंजमाळ परिसरातील पंचशिलनगर भागात राहणारी अल्पवयीन मुलीने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. बुधवारी (दि.४) सायंकाळी मुलगी शिंगाडा तलाव रोडने शिवण क्लासला जात असतांना ही घटना घडली. निखील कंडारे (रा.पंचशिलनगर) नामक तरूणाने तिचा पाठलाग केला. मनोहर मार्केट रिक्षा थांब्यावर मुलीचा रस्ता अडवून संशयीताने तिला लग्नाची मागणी घातली. यावेळी मुलीने त्यास नकार दिला असता संशयीताने तिचा विनयभंग केला. तसेच यावेळी कोणाला सांगितले तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात विनयभंग आणि बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गेंगजे करीत आहेत. दुसरी घटना मखमलाबाद रोडवरील शांतीनगर भागात घडली. गामणे मळा येथे नव्याने सुरू असलेल्या रो हाऊस साईटवर महिलेचे कुटूंबिय वॉचमन म्हणून काम पाहतात. बुधवारी सायंकाळी महिला आपल्या घरात झोपलेली असतांना याच साईटवर प्लँस्टर काम करणा-या परप्रांतीय गवंड्याने तिचा विनयभंग केला. रामनरेश रामधारी यादव (५३ मुळ रा.उत्तरप्रदेश हल्ली अश्वमेधनगर,पेठरोड) असे संशयीताचे नाव आहे. महिला घरात एकटी असल्याची संधी साधून संशयीताने तिच्या घरात प्रवेश करून विनयभंग केला. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयीतास पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शिवाजी अहिरे करीत आहेत.