दोन वर्षांसाठी हद्दपारीची कारवाई केलेल्या तडीपारास पोलिसांनी केले जेरबंद
नाशिक : शहर आणि जिह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपारीची कारवाई केलेली असतांना धारदार शस्त्रासह शहरात वावर ठेवणा-या तडीपारास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. ही कारवाई गंगाघाट भागात करण्यात आली. संशयीताच्या अॅक्टीव्हा दुचाकीमध्ये धारदार कोयता मिळून आला असून,याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विकी किर्ती ठाकूर (२६ रा.शनी मंदिर,गांजवे भवन चाळ,पेठरोड) असे अटक करण्यात आलेल्या संशयीत तडीपाराचे नाव आहे. ठाकूर यांच्या विरोधात खून, लुटमार आणि अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलीसांनी त्याच्या गुन्हेगारी कारवायांच्या पार्श्वभूमीवर सन २०१९ मध्ये हद्दपार नोटीस बजावून त्यास तडीपार केले आहे. मात्र संशयीताचा वावर शहरातच असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. पंचवटीसह शहर गुन्हे शाखा त्याच्या मागावर असतांना युनिट १ च्या पथकास मिळालेल्या माहितीच्या आधारे तो पोलीसांच्या हाती लागला. गोदाघाटावरील वर्दळीच्या ठिकाणी तो येणार असल्याची माहिती सोमवारी (दि.२९) पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा लावण्यात आला होता. गाडगे महाराज पुलाजवळ आपल्या ताब्यातील अॅक्टीव्हा दुचाकी पार्क करून तो तिच्यावर बसलेला मिळून आला. अंग आणि वाहन तपासणीत त्याच्याकडे धारदार कोयता मिळून आला. एमएच १५ जीझेड ०५०२ या अॅक्टीव्हाच्या फुटरेस वरील रबरी मॅट खाली लोखंडी कोयता होता. याप्रकरणी युनिट १ चे कर्मचारी प्रविण वाघमारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक ठाकूर करीत आहेत.
…..
तीन मोटारसायकील चोरी
नाशिक : शहर व परिसरात वाहनचोरीची मालिका सुरूच असून वेगवेगळया ठिकाणाहून तीन मोटारसायकली चोरट्यांनी पळवून नेल्या. याप्रकरणी गंगापूर,सरकारवाडा आणि उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वाहनचोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी पून्हा जोर धरू लागली आहे.
औद्योगीक वसाहतीतील यशवंत शंकर झोडगे (रा.श्रमिकनगर) हे गेल्या बुधवारी (दि.१७) सायंकाळी शिवाजीनगर येथील ध्रुवनगर भागात गेले होते. सत्यम वाईन्स दुकानासमोर त्यांनी आपली पॅशन प्रो (एमएच १५ डीटी २०६२) पार्क केली असता चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक पगार करीत आहेत. दुसरी घटना अशोक स्तंभ भागात घडली. रोहन सुरेश मोरे (रा.मोरे वाडा) यांची अॅक्टीव्हा एमएच १५ सीएच ११०० गेल्या शुक्रवारी (दि.१२) रात्री त्यांच्या वाडा शेजारील यशस्वी गॅरेज समोर नेहमी प्रमाणे पार्क केलेली असतांना चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस नाईक मरकड करीत आहेत. तर तिसरी घटना जेलरोड भागातील खर्जुळ मळा भागात घडली. प्रियंका राजेंद्र आल्हाट (रा.विराजनगर) यांची अॅक्सेस एमएच १५ जीटी ४३६४ गेल्या मंगळवारी (दि.२३) त्यांच्या घरासमोर पार्क केलेली असतांना चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार गोसावी करीत आहेत.
……