दोन मुली बेपत्ता
नाशिक : देवळाली कॅम्प पोलीस ठाणे हद्दीतील दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या आहेत. अज्ञान पणाची संधी साधत कुणी तरी आमिष दाखवून त्यांना पळवून नेल्याचा संशय मुलींच्या कुटूंबियांनी वर्तविला आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवळाली कॅम्प येथील अनुक्रमे १७ आणि साडे चौदा वर्षीय मुली गुरूवार (दि.२५) पासून बेपत्ता आहेत. दुपारच्या सुमारास अज्ञानपणाचा फायदा उचलत कुणी तरी त्यांना कसले तरी आमिष दाखवून पळवून नेल्याचा संशय कुटूंबियांचा आहे. अधिक तपास जमादार प्रकाश गिते करीत आहेत.
…..
दुचाकी अपघातात एक ठार
नाशिक : भरधाव दुचाकी पुढे जाणा-या दुस-या मोटारसायकलवर आदळल्याने झालेल्या अपघातात पाठीमागील दुचाकीस्वार ठार झाला. हा अपघात नाशिक पुणे मार्गावरील शिंदे गाव ब्रिजवर झाला होता. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
गोरख लक्ष्मण कुवर (३८ रा. सरदवाडी ता.सिन्नर) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. कुवर गुरूवारी (दि.२५) सायंकाळच्या सुमारास आपल्या दुचाकीवर सिन्नरच्या दिशेने प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. कुवर यांचा आपल्या वाहनावरील ताबा सुटल्याने त्यांची दुचाकी पुढे धावणा-या एका मोटारसायकलवर आदळली. या अपघातात कुवर गंभीर जखमी झाला होता. त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता दुस-या दिवशी उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यु झाला. अधिक तपास हवालदार लोंढे करीत आहेत.
…..
चक्कर येवून पडल्याने महिलेचा मृत्यु
नाशिक : चक्कर येवून पडल्याने ५५ वर्षीय महिलेचा मृत्यु झाला. ही घटना अशोकामार्ग भागात घडली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. शकुंतला रघुनाथ सानप (रा.अशोकामार्ग) असे मृत महिलेचे नाव आहे. सानप या अंगदुखीने त्रस्त होत्या. शुक्रवारी (दि.२६) दुपारच्या सुमारास आपल्या राहत्या घरात अचानक चक्कर येवून पडले होते. कुटूंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार घुगे करीत आहेत.
…..