नाशिक : दुबई येथील जहाजावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून दोघा भामट्यांनी शहरातील एका बेरोजगारास लाखोंचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकी सह आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभय कुमार आणि राहूल सिंग अशी फसवणुक करणा-या भामट्यांची नावे असून याप्रकरणी दीपक पुरणमल कुमावत (रा.वृंदावननगर,आडगाव) यांनी तक्रार दाखल केली आहे. कुमावत उच्चशिक्षीत असून ते दिल्ली येथे गेले होते. या ठिकाणी दोघा भामट्यांनी त्यांना गाठले. दुबई येथे मर्चंट नेव्हीत भरती सुरू असून आपली चांगली ओळख असल्याचे भासवून तेथे पैसे भरल्यास कायमस्वरूपी नोकरी मिळेल असा सल्ला दिला. त्यामुळे कुमावत यांनी विश्वास ठेवल्याने ही फसवणुक झाली. गेल्या २५ फेब्रुवारी ते १८ ऑगष्ट दरम्यान संशयीतांनी ऑनलाईन सव्वा तीन लाख रूपये ऑनलाईन बँक खात्यात भरण्यास भाग पाडले. त्यानुसार कुमावत यांनी पैसे भरले असता संशयीतांनी दुबई येथे जाण्यासाठी विमान तिकीट काढले असल्याचे सांगून कुमावत यांना मुबई विमानतळावर बोलावले. दोन दिवस थांबूनही कुमावत यांचा संबधीतांचा संपर्क न झाल्याने ते घरी परतले. त्यानंतरही संशयीतांनी कुमावत यांच्याशी संपर्क साधून दिल्लीत बोलावले. तेथेही मुंबईसारखाच अनुभव आल्याने आपण फसवलो गेल्याचे लक्षात आल्यानंतर कुमावत यांनी सायबर पोलीस ठाणे गाठले असून, अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक श्रीपाद परोपकारी करीत आहेत.