दुचाकीस्वार टोळक्याकडून बसचालकास मारहाण
नाशिक : कुठेही बस थांबवितो या कारणातून दुचाकीस्वार टोळक्याने बसचालकास बेदम मारहाण केल्याची घटना महामार्गावरील अमृतधाम परिसरात घडली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात चार जणांविरूध्द मारहाण आणि शासकिय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवनित मिथीलेश पटेल (२२ रा.शिवकृपानगर,हिरावाडी),अंगत दत्तात्रेय देवरे (२६ रा.आयोध्यानगरी,साईनगर),वैभव राजेंद्र कर्डक (२९ रा.साईनगर,अमृतधाम) आणि सचिन ज्ञानेश्वर निकम (रा.शिवकृपानगर,हिरावाडी) अशी बसचालकास मारहाण करणा-या संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी सुनिल सजन शिंदे (रा.संजयनगर,पंचवटी) यांनी तक्रार दाखल केली आहे. शिंदे एस.टी.महामंडळात चालक पदावर कार्यरत असून, रविवारी (दि.२७) सायंकाळी ते नाशिक जळगाव (एमएच ४० एन ९८३२) या बसवर सेवा बजावत असतांना ही घटना घडली. प्रवाश्यांना घेवून ते जळगावच्या दिशेने जात असतांना महामार्गावरील अमृतधाम चौफुली भागात ते सर्व्हीस रोडने जात असतांना दुचाकीस्वार संशयीत टोळक्याने मोटारसायकली आडवी लावून बस थांबविली. यावेळी संतप्त टोळक्याने बस कोठेही उभी करतो असा जाब विचारत चालकास कॅबीनमधून ओढून काढत लाथाबुक्यांनी मारहाण केली. यावेळी संशयीतांनी पुन्हा या रोडवर दिसला तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गिरी करीत आहेत.
…….
कारच्या धडकेत पादचारी ठार
नाशिक : भरधाव कारने दिलेल्या धडकेत ५० वर्षीय पादचारी ठार झाला. हा अपघात नांदूरनाका ते जत्रा हॉटेल मार्गावर झाला. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरूध्द अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदू सुकदेव वाघ (रा. दत्तनगर,आडगाव) असे अपघातात ठार झालेल्या पादचारीचे नाव आहे. वाघ रविवारी (दि.२७) नांदूरनाक्याकडून जत्रा हॉटेलच्या दिशेने पायी जात असतांना हा अपघात झाला. पाठीमागून भरधाव आलेल्या एमएच १५ जीएल ७३७१ या स्विफ्ट कारने त्यांना धडक दिली. या अपघातात वाघ गंभीर जखमी झाले होते. त्यात त्यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी अज्ञात चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.
……..
भाजीपाला विक्रेत्यास तलवारीचा धाक
नाशिक : भाजीपाला उधारीचे पैसे मागितल्याने एकाने विक्रेत्यास तलवारीचा धाक दाखवित दमदाटी केल्याची घटना गोरेवाडीतील डायमंडवाडीत घडली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लक्ष्मण कुमावत (रा.सुंदरनगर,देवळाली गाव) असे संशयीताचे नाव आहे. याप्रकरणी विकास बाळू गायकवाड (रा.आंबेडकर नगर जेलरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. गायकवाड भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. रविवारी (दि.२७) सायंकाळी ते डॉयमंड कॉलनी येथे भाजीपाला विक्री करीत असतांना ही घटना घडली. संशयीत तेथे आल्याने गायकवाड यांनी त्याच्याकडे उधारीच्या पैश्यांची मागणी केली असता त्याने शर्टात लपविलेली धारदार तलवार काढून धाक दाखविली.यावेळी संशयीताने शिवीगाळ करीत दमदाटी केली. अधिक तपास हवालदार साबळे करीत आहेत.
……….
दुचाकी घसरल्याने वृध्दाचा मृत्यु
नाशिक : भरधाव दुचाकी घसरल्याने ६० वर्षीय वृध्दाचा मृत्यु झाला. हा अपघात नाशिक पुणा मार्गावरील दाराण नदीच्या पुलावर झाला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
विनायक सुधाकर काळमेख (रा.साळी गल्ली,सिन्नर) असे मृत वृध्द दुचाकीस्वाराचे नाव आहे. काळमेख हे रविवारी (दि.२७) कामानिमित्त शहरात आले होते. सायंकाळच्या सुमारास ते आपल्या दुचाकीने घराकडे परतत असतांना हा अपघात झाला. दारणा नदी पात्रावरील ब्रीजवर भरधाव दुचाकी घसरल्याने ते गंभीर जखमी झाले होते. कुटूंबियांनी त्यांना तातडीने नजीकच्या साईकेअर रूग्णालयात प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ ऋषीकेश हॉस्पिटल येथे हलविले असता उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यु झाला. अधिक तपास हवालदार गांगुर्डे करीत आहेत.