दुचाकीस्वारास कारमधील चौघांनी लुटले
नाशिक : कट मारल्याचा बहाणा करीत कारमधील चौघांनी दुचाकीस्वारास मारहाण करीत लुटल्याची घटना वर्दळीच्या कॉलेजरोड भागात घडली. या घटनेत कारमधील संशयीतांनी दुचाकीस्वाराच्या खिशातील रोकडसह मोबाईल बळजबरीने काढून पोबारा केला असून, याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यात चार संशयीतांची नावे असून याप्रकरणी ओमकार विलास पाटील (रा.ए वनश्री अपा.अंजनीनगर) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. पाटील सोमवारी (दि.९) रात्री कॉलेजरोडवरील डेअरी डॉन समोरून आपल्या दुचाकीने (एमएच १८ बीएफ ६५४८) प्रवास करीत असतांना ही घटना घडली. पाठीमागून आलेल्या कारमधील संशयीतांनी दुचाकी अडवून आमच्या गाडीस का कट मारला असा वाद घातला. यावेळी संशयीतांनी नुकसान भरपाईची मागणी करीत पाटील यास शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी मारहाण केली. या घटनेत एकाने हातातील कड्याने पाटील यांना मारल्याने ते जखमी झाले. एवढ्यावरच न थांबता संशयीत टोळक्याने पाटील यांच्या खिशातील मोबाईल आणि पाकिट बळजबरीने काढून पोबारा केला. पाकिटात एक हजार १०० रूपयांची रोकड आणि महत्वाची कागदपत्र होती. अधिक तपास उपनिरीक्षक परदेशी करीत आहेत.
….…..
दुचाकींच्या धडकेत एक ठार
नाशिक : भरधाव वेगातील दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात एक तरूण ठार झाला. हा अपघात मालेगाव स्टॅण्ड चौकात झाला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोविंद जुगलकिशोर दायमा (२९ रा.रोहिनी नगर,पेठरोड) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी आकाश गुप्ता (रा.गुरूद्वारानगर,शिंगाडा तलाव) यांनी तक्रार दाखल केली आहे. गुप्ता व दायमा हे दोघे मित्र सोमवारी (दि.९) रात्री रविवार कारंजा कडून कपालेश्वर मंदिरच्या दिशेने आपल्या अॅक्सीस (एमएच १५ ईजे १७४३) दुचाकीवर जात असतांना हा अपघात झाला. मालेगाव स्टॅण्ड चौकात समोरून भरधाव आलेल्या एमएच १५ एफजे १०९२ या अॅक्टीवाने अॅक्सीस दुचाकीस धडक दिली. या अपघातात दायमा गंभीर जखमी झाले होते. दुस-या दिवशी त्यांच्यावर उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यु झाला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक संदिप चोपडे करीत आहेत.
…..
प्रशिक्षण केंद्र फोडले
नाशिक : कुकूट पालन प्रशिक्षण केंद्र फोडून चोरट्यांनी यंत्रणेतील इलेक्ट्रीक मोटारी आणि कार्यालयातील खुर्च्या चोरून नेल्याची घटना एबीबी सर्कल भागात घडली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. तुषार गोपाळराव गिते (रा.आनंदविहार कॉलनी,गंगापूररोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. गिते यांचे एबीबी सर्कल परिसरात सधन कुकूट विकास नावाची संस्था असून या संस्थेच्या माध्यमातून कुकूट पालनाचे प्रशिक्षण दिले जाते. शनिवारी (दि.७) रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद प्रशिक्षण केंदाचा कडीकोयंडा तोडून प्रशिक्षण हॉलमधील कुकट खाद्य यंत्रणेच्या पाच इलेक्ट्रीक मोटारी आणि आठ खुर्च्या चोरून नेल्या अधिक तपास हवालदार बोळे करीत आहेत.