दुचाकीस्वार तरूणीचा मोबाईल पळविला
नाशिक : मामे भावाबरोबर दुचाकीवर प्रवास करणा-या तरूणीच्या हातातील मोबाईल ट्रिपलसिट असलेल्या चोरट्यांनी हिसकावून पोबारा केल्याची घटना नाशिक पुणे मार्गावरील शिंदे गावानजीक घडली. विशेष म्हणजे चोरट्यांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपुर्वा राजेंद्र कुलथे (१९ रा.नायगाव ता.सिन्नर) या युवतीने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. अपुर्वा कुलथे व तिचा मामे भाऊ साहिल नवसे हे दोघे मंगळवारी (दि.३०) सायंकाळच्या सुमारास आपल्या दुचाकीवर सिन्नरच्या दिशेने प्रवास करीत असतांना ही घटना घडली. पाठीमागून ट्रिपलसिट आलेल्या भामट्यांपैकी एकाने अपुर्वाच्या हातातील मोबाईल हिसकावून नेला. ट्रिपलसीट असलेल्या भामट्यांमध्ये एक महिलाही होती. कुलथे आणि नवसे या बहिण भावाने भामट्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्रिकुटाने त्यांना शिवीगाळ करीत मोबाईल पळवून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक भालेराव करीत आहेत.
…..
कारच्या धडकेत दुचाकीस्वार वृध्देचा मृत्यु
नाशिक : भरधाव कारने धडक दिल्याने दुचाकीस्वार वृध्देचा मृत्यु झाला. ७० वर्षीय वृध्दा आपल्या नातवासमवेत डबलसिट प्रवास करीत असतांना हा अपघातात झाला होता. याप्रकरणी उपनगर हिराबाई वसंत रोकडे (७० , रा.आनंदरोड, देवळाली कॅम्प) असे अपघातात मृत्यु झालेल्या वृध्देचे नाव आहे. याप्रकरणी प्रशांत डोळस यांनी तक्रार दाखल केली आहे. हिराबाई रोकडे या डोळस यांच्या आजी असून मंगळवारी (दि.३०) सायंकाळी दोघे आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना ही घटना घडली. नातूच्या दुचाकीवर (एमएच १५ ई ९९८३) आजी डबलसिट प्रवास करीत असतांना, इच्छामणी मंगल कार्यालयासमोरील रोडवर पाठीमागून भरधाव आलेल्या कारने (एमएच १५ एफव्ही ६५१९) अचानक वळण घेत दुचाकीस धडक दिली. या अपघातात आजी हिराबाई रोकडे या जमिनीवर पडल्या होत्या. या घटनेत डोक्यास वर्मी मार लागल्याने त्यांना तात्काळ रूग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतांना मृत्यु झाला अधिक तपास हवालदार मुन्तोडे करीत आहेत.
……
अवैध मद्यविक्री करणारा जेरबंद
नाशिक: बेकायदा मद्यविक्री पोलीसांनी एकास बेड्या ठोकल्या. या कारवाईत संशयीताच्या ताब्यातून देशी दारूचा साठा हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश शांताराम सुमराव (३४, रा. वंसतदादानगर, आडगाव, मुळ टोकरे, ता.मालेगाव) असे अटक करण्यात आलेल्या संशयीताचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सुमराव हा अवैधरीत्या देशी दारू विक्री करीत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी (दि.३०) दुपारच्या सुमारास पोलीसांनी छापा टाकला असता बेकायदा मद्यविक्री करतांना मिळून आला संशयीताच्या ताब्यातून सुमारे एक हजार रूपये किमतीचा प्रिन्स संत्रा या दारूचा साठा हस्तगत करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार नरवडे करीत आहेत.
…….