नाशिक : जुन्या वादाची कुरापत काढून दुचाकीवर आलेल्या तीन जणांच्या टोळक्याने अल्पवयीन युवकास बेदम मारहाण केल्याची घटना बाजार समितीच्या दक्षिण प्रवेशद्वारावर घडली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकास अटक करण्यात आली आहे.
कुणला विजय थोरात (२३, रा. एरंडवाडी पेठफाटा) असे अटक करण्यात आलेल्या संशयीताचे नाव असून त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी स्वप्निल सुभाष वरणकर (१६ रा.एरंडवाडी,पेठरोड) या अल्पवयीन युवकाने तक्रार दाखल केली आहे. वरणकर बुधवारी (दि.६) रात्री मार्केट यार्डच्या प्रवेशद्वारावर उभा असतांना अॅक्टीव्हावर (एमएच १५ एचएफ ९६१६) या दुचाकीवर ट्रिपलसिट आलेल्या त्रिकुटाने त्यास गाठले यावेळी संशयीतांनी आम्हास मारण्यासाठी मुले घेवून येणार आहे का या कारणावरून कुरापत काढून वरणकर यास बेदम मारहाण केली. या घटनेत अटक केलेल्या थोरात याने लाकडी दांडक्याने मारहाण केल्याने वरणकर जखमी झाला असून एवढ्यावरच न थांबता संतप्त टोळक्याने त्याचा मोबाईल हिसकावून घेत फोडून टाकला तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे पोलीस दप्तरी नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार शेळके करीत आहेत.
.