दुचाकी घसरल्याने एक ठार
नाशिक – भरधाव दुचाकी स्पिडब्रेकरवर घसरल्याने चालकाचा मृत्यु झाला. हा अपघात नांदूर ते उपनगर मार्गावर झाला. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. प्रकाश श्रावण खंडारे (३८ रा.प्रगती कॉलनी,उपनगर) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. खंडारे रविवारी (दि.६) सायंकाळच्या सुमारास आपल्या हिरोहोंडा (एमएच १५ एक्स २४२७) दुचाकीने घराकडे जात असतांना हा अपघात झाला होता. नांदूरगावाकडून उपनगरच्या दिशेने जात असतांना गोदावरी लॉन्स जवळ भरधाव दुचाकी स्पिडब्रेकरवर आदळली. या अपघातात खंडारे दुरवर फेकले गेल्याने गंभीर जखमी झाले. त्यात त्यांचा मृत्यु झाला. अधिक तपास हवालदार गांगुर्डे करीत आहेत.
…..
दुचाकीस्वारास मारहाण
नाशिक : पोलीसात तक्रार दिल्याचे कारणातून एकाने पाठलाग करून दुचाकीस्वारास बेदम मारहाण केल्याची घटना मोरे मळा भागात घडली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दौलत दिवे असे मारहाण करणा-या संशयीताचे नाव आहे. याप्रकरणी अशोक लक्ष्मण गायकवाड (रा.रामनगर,मोरे मळा) यांनी तक्रार दाखल केली आहे. गायकवाड रविवारी (दि.६) दुपारच्या सुमारास आपल्या अॅक्टीव्हा (एमएच १५ डीए ५४९०) दुचाकीवर प्रवास करीत असतांना ही घटना घडली. मोरे मळयातील रामनगर रस्त्याने ते प्रवास करीत असतांना संशयीताने त्यांचा मोटारसायकलवर पाठलाग केला. एप्रिल महिन्यात पोलीस तक्रार दिल्याचा राग मनात धरून संशयीताने अश्विनी किराणा दुकानासमोर वाट अडवित गायकवाड यांना शिवीगाळ केली. यावेळी संतप्त संशयीताने लाथाबुक्यांनी आणि शेजारी पडलेल्या लाकडी दांडक्याने त्यांना बेदम मारहाण करून जखमी केले. अधिक तपास हवालदार पाटील करीत आहेत.
…..
पेठरोडला एकाची आत्महत्या
नाशिक : पेठरोड भागात राहणा-या ५० वर्षीय इसमाने गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर व्यक्तीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
प्रदिप मधुकर बैरागी (रा.गोविंद अपा.सप्तरंग सोसा.मागे पेठरोड) असे आत्महत्या करणा-या इसमाचे नाव आहे. प्रदिप बैरागी यांनी मंगळवारी (दि.८) आपल्या राहत्या घरी अज्ञात कारणातून किचनच्या छतास असलेल्या हुकास दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यु झाला. ही घटना रात्री उघडकीस आली. अधिक तपास हवालदार पवार करीत आहेत.
…
अनोळखी मृतदेहाबाबत पोलीसांचे आवाहन
नाशिक : भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ठार झालेल्या वृध्दाची अद्याप ओळख पटली नसून, सदर इसमाबाबत माहिती असल्यास वाडिव-हे पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन हवालदार भाऊसाहेब भगत यांनी केले आहे. हा अपघात मुंबई आग्रा महामार्गावरील पाडळी फाटा (ता.इगतपुरी) येथे झाला होता.
२१ नोव्हेंबर रोजी भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने ६३ वर्षीय अनोळखी व्यक्तीस धडक दिली होती. या अपघातात सदर व्यक्ती ठार झाला असून त्याची अद्याप ओळख पटलेली नाही. याप्रकरणी पसार झालेल्या अज्ञात वाहनचालकाविरोधात वाडिव-हे पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर व्यक्तीची उंची पाच फुट असून,रंगाने निमगोरा,चेहरा उभट अश्या वर्णनाचा आहे. त्याने अंगात मळकट शर्ट आणि निळया रंगाची नाईट पॅंण्ट परिधान केलेली आहे. सदर इसमाबाबत माहिती असल्यास पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन हवालदार भगत यांनी केले आहे.