दुकान फोडून चोरट्यांनी कत्तलीसाठी आणलेले पाच बोकड
नाशिक : दुकान फोडून चोरट्यांनी कत्तलीसाठी आणलेले पाच बोकड चोरून नेल्याची घटना औद्योगीक वसाहतीतील कार्बननाका भागात घडली. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिरोज शरीफ कुरेशी (रा. काजीपुरा कोट जुने नाशिक) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. कुरेशी यांचा कार्बन नाका भागात मांस विक्रीचा व्यवसाय आहे. गेल्या बुधवारी (दि.१७) रात्री ते आपले दुकान वाढवून घरी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यानी दुकानाचे कुलूप तोडून आत बांधलेले सुमारे २५ हजार रूपये किमतीचे पाच बोकड चोरून नेले. अधिक तपास पोलीस नाईक चव्हाण करीत आहेत.
……
कारागृहातील आजारी कैद्याचा उपचारादरम्यान मृत्यु
नाशिक : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील आजारी कैद्याचा सोमवारी (दि.२२) उपचारादरम्यान मृत्यु झाला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. राजेंद्र पुंडलिक निगड असे मृत बंदी आहे. राजेंद्र निगड हा गेल्या काही दिवसांपासून अज्ञात आजाराने त्रस्त होता. सेंट्रल जेल दवाखान्यात त्याच्यावर उपचार सुरू आहे. सोमवारी सकाळी अचानक बेशुध्द पडल्याने त्यास अधिक उपचारार्थ जेल कर्मचारी काशिनाथ जामळे यांनी जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास उपनिरीक्षक गोसावी करीत आहेत.
…..
गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यु
नाशिक : भरधाव दुचाकी घसरल्याने गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यु झाला. गेली सात दिवस महिला खासगी रूग्णालयात मृत्युशी झुंज देत होती. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. कांचन गोपाल कासार (३० रा.आनंद विहार,भगवतीनगर हिरावाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. कांचन कासार या गेल्या सोमवारी (दि.१५) दळण दळण्यासाठी गिरणीवर जात असतांना हा अपघात झाला होता. मोपेड दुचाकीवर प्रवास करीत असतांना परिसरातील माऊली किराणा दुकानासमोर त्यांची दुचाकी घसरली होती. या अपघातात त्यांच्या डोक्यास वर्मी मार लागल्याने पती गोपाल कासार यांनी त्यांना सुधर्म रूग्णालयात दाखल केले असता सोमवारी (दि.२२) उपचार सुरू असतांना मृत्यु झाला. अधिक तपास हवालदार वणवे करीत आहेत.