नाशिक – ऊर्जा विभागाच्या कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० ची अंमलबजावणी नाशिक परिमंडळात गतीने सुरु असून यामध्ये परिमंडळात एकूण २ हजार ८७३ कृषिपंपांच्या नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या असून यामध्ये लघुदाब वाहिनीच्या वीजखांबापासून ३० मीटरच्या आत असलेल्या २ हजार ५३४ जोडण्यांचा समावेश आहे. तर या योजनेअंतर्गत नाशिक परिमंडळात १ लाख ५३ हजार ६२० शेतकऱ्यांनी कृषीपंप थकबाकीपोटी ११९ कोटी रुपयांचा भरणा करून योजनेचा लाभ घेतला आहे.
कृषिपंप वीजजोडणी धोरणानुसार लघुदाब वीजवाहिनीच्या खांबापासून ३० मीटरच्या आत असलेल्या कृषिपंपांना परिसरातील नजिकच्या रोहित्राची क्षमता पर्याप्त असल्यास नवीन वीजजोडणी देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहेत. यासोबतच ज्या कृषिपंपांद्वारे अनधिकृत वीजवापर सुरु आहे त्यांनाही नवीन वीजजोडण्या देण्यात येत आहेत. ज्या ठिकाणी रोहित्रांची क्षमता पर्याप्त नाही त्या रोहित्रांची क्षमतावाढ करण्यात येणार आहे. लघुदाब वीजवाहिनीच्या खांबापासून ३० मीटरच्या आत अंतर असलेल्या नाशिक मंडळामध्ये ५०५, मालेगाव मंडळामध्ये २५५ आणि अहमदनगर मंडळामध्ये १७७४ वीज जोडण्या अशा एकूण नाशिक परिमंडळामध्ये २५३४ जोडण्या देण्यात आल्या आहेत.
नवीन कृषीपंप वीज धोरणास शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. ऑक्टोबर २० मध्ये जाहीर झालेल्या या योजनेत थकबाकी भरण्यासाठी विविध सवलती जाहीर झाल्यापासून नाशिक मंडलात १९हजार २६३ शेतकऱ्यांनी थकबाकीपोटी२२ कोटी ३६लाख रुपयांचा, मालेगाव मंडलात २३हजार ७५ शेतकऱ्यांनी थकबाकीपोटी२६कोटी ३६लाख रुपयांचा आणि अहमदनगर मंडलात १ लाख १० हजार ९३० शेतकऱ्यांनी थकबाकीपोटी ७० कोटी ७लाख रुपयांचा याप्रमाणे एकूण नाशिक परिमंडळात १ लाख ५३ हजार २६८ शेतकऱ्यांनी कृषीपंप थकबाकीपोटी ११९ कोटी रुपयांचा भरणा करून या योजनेचालाभ घेतला आहे. या योजनेचा लाभ परिमंडळातील सर्वच शेतकरी बंधूनी घेण्याचे आवाहन नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता दिपक कुमठेकर यांनी केले आहे.
राज्यात १ एप्रिल २०१८ नंतर प्राप्त झालेल्या अर्जांनुसार कृषिपंपांच्या नवीन वीजजोडण्या देण्याची प्रक्रिया ठप्प झाली होती. त्यास पुन्हा गती देण्यासाठी ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी पुढाकार घेत राज्यात प्रथमच कृषिपंप वीजजोडणी व थकबाकीमध्ये सवलती संदर्भात स्वतंत्र धोरण तयार करण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० प्रत्यक्षात आले.
या अभियानानुसार लघुदाब वाहिनीपासून ३० मीटर व २०० मीटरच्या आत आणि रोहित्राची क्षमता पर्याप्त असलेल्या ठिकाणी तसेच उच्चदाब वाहिनीपासून ६०० मीटरपर्यत उच्चदाब वितरण प्रणाली (HVDS) द्वारे एका रोहित्राद्वारे जास्तीतजास्त दोन कृषिपंपांना वीजजोडणी देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच उच्चदाब वाहिनीपासून ६०० मीटरपेक्षा अधिक अंतरावरील कृषिपंपांना सौर ऊर्जेद्वारे नवीन वीजजोडणी देण्यात येणार आहे.
महावितरणने कृषिपंप नवीन वीजजोडणी व थकबाकीमध्ये सवलत तसेच इतर मुद्द्यांच्या माहितीसाठी https://www.mahadiscom.in/solar/AG_Policy/index.php या स्वतंत्र वेब पोर्टलची निर्मिती केली आहे. तसेच ज्या कृषिपंपधारकांना नवीन वीजजोडणीसाठी अर्ज करावयाचा आहे त्यांना ऑनलाईनद्वारे मराठीमध्ये अर्ज करण्याची सोय उपलब्ध आहे. महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत वेबसाईटवर या वेबपोर्टलची लिंक देण्यात आली आहे.