नाशिक – येथील ट्रेकिंग कम्युनिटी या ग्रुपतर्फे रामशेज किल्ल्यावर स्वच्छता मोहिम पार पडली. अनलॉक होताच बहुतांश जणांनी ट्रेकिंगचा पर्याय निवडल्याचे चित्र दिसून आले. दरम्यान, यावेळी रामशेज किल्ल्यावर असलेल्या कचरा गोळा करण्यासाठी व किल्ल्यावर स्वच्छता करण्यासाठी ट्रेकिंग कम्युनिटीने पुढाकार घेतला.
मोहिमेत सहभागी होण्यासाठी मेसेजद्वारे शहरातील नागरिकांना आणि गिर्यारोहकांना आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार शहरातील नागरिक मोठ्या संख्येने यात सहभागी झाले होते. गडकिल्ल्याचे संवर्धन व्हावे तसेच दुर्लक्षित किल्यांची माहिती मिळावी यासाठी ट्रेकिंग कम्युनिटी नेहमी उपक्रम घेत असते. असाच उपक्रम स्वच्छता मोहिमेचेचा घेण्यात आला होता. यावेळी ओला कचरा आणि सुका कचरा संकलित करण्यात आला. प्रत्येक स्वयंसेवकाला कचरा गोळा करण्यासाठी विशिष्ट साहित्य देण्यात आले होते. अलीकडेच अंजनेरीच्या संवर्धनाचा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यामुळे, शहरातील ट्रेकिंग संस्था गडकिल्यांच्या संवर्धनासाठी आणि तेथील स्वच्छतेसाठी एकत्र आले. सकाळी ७ ते ९.३० यावेळेत ही स्वच्छता मोहीम राबवली गेली. कचरा संकलित करून त्याचे योग्य व्यवस्थापन केले जाणार असल्याचे स्वसंसेवकांनी सांगितले. यात ९० हुन अधिक ट्रेकर्स सहभागी झाले होते. यावेळी ९ ते १० मोठ्या गार्बेज बॅग कचरा संकलित करण्यात आला.
—
तीन तासात जवळपास १० गार्बेज बॅग कचरा गोळा
यंदाच्या दिवाळीत किल्ल्याची स्वच्छता करावी या हेतूने मोहीम आयोजित केली होती. फिरायला येणाऱ्या पर्यटकांकडून होणार कचरा संकलित करण्यासाठी प्रशासनातर्फे प्रयत्न कमी होत असल्याने जबाबदारी म्हणून हे काम हाती घेतले. २.३० ते ३ तासात जवळपास १० गार्बेज बॅग कचरा गोळा केला.
– संजय अमृतकर, ट्रेकर