दारू, जेवणाच्या बिलावरून मारहाण, तोडफोड
नाशिक : ‘जेवण व दारुच्या बिलात पापडाचे बिल का लावले’ अशी विचारणा करत कुरापत काढून दहा ते बारा जणांनी हॉटेलमध्ये तोडफोड करत स्टाफ व वेटरला लाकडी दांडके आणि कोयत्याने मारहाण केल्याची घटना सातपूर परिसरात शनिवारी (दि. २०) घडली. याप्रकरणी शेखर सदानंद शेट्टी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावतामाळी, बिट्टू, धिरज परदेशी (पुर्ण नाव व पत्ता माहिती नाही), शरद सुधाकर पाटील (रा. राज्य कर्मचारी वसाहत) यांच्यासह सात ते आठ जण या प्रकरणात संशयित आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास संशयित हॉटेल राज दरबार, एमआयडीसी, सातपूर येथे गेले होते. यावेळी दारू व जेवणाच्या बिलात पापडाचे बिल का लावले, अशी विचारणा करत त्यांनी कॅश काऊंटरवरील कृष्णा शेट्टी यांच्यासोबत वाद घातला व बिल न देताच निघून गेले. त्यानंतर थोड्या वेळाने सात ते आठ जणांना घेवून पुन्हा हॉटेलमध्ये आले व सामानाची तोडफोड केली. तसेच स्टाफ व वेटरला लाकडी दांडके व कोयत्याने मारहाण करून उपस्थित ग्राहकांना देखील शिवीगाळ केली करत दशहत निर्माण केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक काळे तपास करत आहे
…….
चाकूचा धाक दाखवून चालकास लुटले
नाशिक : ट्रक आडवून चाकूचा धाक दाखवत चौघांनी चालकास लुटल्याची घटना आरोग्य विज्ञान विद्यापीठ परिरसरात दिंडोरी रोडवर घडली. याप्रकरणी राजेंद्र पंढरीनाथ बेनके (रा. खर्डी, ता. शहापूर) यांनी म्हसरुळ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. २१) पहाटे तीनच्या सुमारास फिर्यादी बेनके हे ट्रक घेवून विद्यापीठजवळील रंगून ढाबा परिसरात असताना मोटरसायकलवरून आलेल्या चौघांनी त्यांना थांबवले. त्यातील तिघांनी ट्रकमध्ये चढून फिर्यादीस चाकूचा धाक दाखवत मोबाइल, आधार, पॅन व ड्रायव्हिंग लायसन्स असा एकूण ५ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून पळून गेले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक एस. पाटील तपास करत आहे.
——–
२७ हजारांची घरफोडी
नाशिक : बंद दरवाजाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करत अज्ञात चोरट्याने २६ हजार ७०० रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी अशोक भागवत भोळे (रा. जत्रा हॉटेल मागे, स्वामी समर्थनगर) यांनी आडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शनिवारी (दि. २०) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घरी कोणी नसताना अज्ञात चोरट्याने दरवाजाचे कुलूप तोडून भोळे यांच्या घरात प्रवेश केला. हॉल व बेडरुमधील साहित्याची चोरी केली. यात २० हजार रुपये किंमतीचा लॅपटॉप व चार्जर, एक मोबाइल व सीम कार्ड, १०० रुपये किंमतीची पर्स व त्यातील सोन्याच्या पावत्या, दोन हेडफोनचा समावेश आहे. याप्रकरणी हवालदार वाढवणे तपास करत आहे.