नाशिक : शहरात उपद्रव करणा-या सराईतांंना वटणीवर आणण्यासाठी पोलीसांनी एमपीडीए कारवाईचा धडाका लावला आहे. नाशिकरोडसह परिसरात दहशत निर्माण करणा-या एका सराईतास नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द करण्यात आले आहे. विशेष म्हणजे संशयीतावर यापूर्वीही ही कारवाई झालेली असतांना त्यांने गुन्हेगारी कारवाया सुरूच ठेवल्याने पुन्हा त्याच्यावर स्थानबध्द कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
अक्षय गणेश नाईकवाडे (२४ रा.अश्विनी कॉलनी,हनुमाननगर सामनगाव रोड) असे स्थानबध्द करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. शहरातील टोळी युध्द आणि गुन्हेगारी संपुष्टात आणण्यासाठी पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी एमपीडीए कायद्यान्वये कारवाईचा धडाका लावला आहे. नाईकवाडे याची अश्विनी कॉलनी,अरिंगळे मळा,सिन्नर फाटा,गायकवाड मळा,गोरेवाडी,रेल्वे स्टेशन आणि परिसरातील दहशत लक्षात घेता व त्याच्यावर असलेल्या गंभीर गुह्यांची दखल घेत त्याच्यावर पुन्हा स्थानबध्द कारवाई करण्यात आली आहे. सन.२०१९ मध्येही त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली होती. मात्र कारागृहातून बाहेर पडताच गुन्हेगारी,हिंसक वर्तन आणि धोकादायक कारवाया कायम ठेवल्याने त्याच्याविरूध्द एमपीडीए कायद्यान्वये पुनर्रकारवाई करण्यात आली आहे. यापूढेही शहरातील जनजीवन विस्कळीत करणा-या तसेच समाज स्वास्थ बिघडवणा-यांवर ही कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीसांनी स्पष्ट केले आहे.