नाशिक : दरोड्याच्या तयारीत असल्या प्रकरणी अटक केलेल्या ९ पैकी ३ जणांना जिल्हा व सत्र न्यायाधिश एस.टी.पांडे यांनी कारावासाची शिक्षा सुनावली. त्यातील एकास ६३ दिवस, दुस-यास ५८ दिवस तर तिस-यास दोन महिन्यांची साध्या कैदेचा समावेश आहे. कुंभमेळा कालावधीत मीनाताई ठाकरे स्टेडियम भागात पंचवटी पोलिसांनी या टोळीस जेरबंद केले होते.
श्रीराम शिवपाल आझाद, शिवप्रसाद राजजग आझाद आणि सुरेशकुमार स्वामीनाथन नायडू (सर्व रा. उत्तरप्रदेश) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. २६ आॅगस्ट २०१५ रोजी मध्यरात्री पंचवटी पोलिसांनी ९ जणांच्या टोळीला संशयास्परित्या फिरताना जेरबंद केले होते. या परप्रांतीय टोळीच्या अंगझडतीत गज, लाकडी दांडा, कोयता आदी शस्त्र आढळून आली होती. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक डी. जे. मुळे यांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील योगेश कापसे यांनी युक्तीवाद केला. त्यात तिघा संशयितांविरोधात खटला सुरु असताना त्यांना परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे मुंबई पोलीस कायदा कलम १२२ नुसार श्रीराम आझाद यास ६३ दिवस, शिवप्रसाद आझाद यास ५८ आणि सुरेशकुमार नायडू यास २ महिन्यांची साधी कैद सुनावण्यात आली. याप्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून पोलीस नाइक एस. एल. जगताप यांनी कामकाज पाहिले. या टोळीतील उर्वरीत संशयीत घटनेनंतर फरार झाले असून त्यांच्याविरूध्द खटला सुरू राहणार आहे.