तोतया पोलीसांनी सोनसाखळी लांबविली
नाशिक : चेकिंग करीत असल्याचे भासवून तोतया पोलीसांनी वृध्दाच्या सोनसाखळी आणि अंगठीवर डल्ला मारला. दागिणे पिशवीत ठेवण्याचा बहाणा करून अंगठी व चैन हातोहात लांबविली असून ही घटना पाथर्डी वडनेर मार्गावर घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वामन मालाजी निकम (६४ रा.साई मंदिराजवळ,आयोध्या कॉलनी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. निकम बुधवारी (दि.७) पाथर्डी फाट्याकडून पाथर्डी गावाच्या दिशेने पायी जात असतांना ही घटना घडली. केपी चिकन सेंटर नजीक दोघा भामट्यांनी त्यांना गाठले. पोलीस असल्याची बतावणी करीत पुढे चोरी झाली आहे असे सांगून दोघांनी वृध्दाच्या पिशवीची तपासणी केली. यावेळी हातातील अंगठी आणि सोनसाखळी असे सुमारे ७८ हजार रूपये किमतीचे दागिणे पिशवीत ठेवण्याचा बहाणा करीत भामट्यांनी ते हातोहात लांबविले. अधिक तपास उपनिरीक्षक जगदाळे करीत आहेत.
……
महिलेची पोत खेचली
नाशिक : पती समवेत औषधे खरेदीसाठी मेडिकल स्टोअर्स मध्ये जाणा-या महिलेच्या गळय़ातील सोन्याची पोत दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना मखमलाबाद रोडवर घडली. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माया सुनिल वैद्य (रा.विद्यानगर,लिलावती हॉस्पिटल मागे) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. वैद्य या बुधवारी (दि.७) सायंकाळच्या सुमारास परिसरातील मेडिकल स्टोअर्स येथे औषधे घेण्यासाठी पतीसमवेत पायी जात असतांना ही घटना घडली. गॅस गोडावून नजीकच्या मोकळया प्लॉट भागातून वैद्य दांम्पत्य पायी जात असतांना दुचाकीवर आलेल्या भामट्यांपैकी एकाने महिलेच्या गळयातील सुमारे ४५ हजार रूपये किमतीची सोन्याची पोत ओरबाडून नेली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक अहिरे करीत आहेत.
…..