तोतया पोलीसांनी मदतीचा बहाणा करून वृध्दाची सोनसाखळी,अंगठी केली लंपास
नाशिक : पुढे गांजा कारवाई सुरू असल्याची बतावणी करीत दुचाकीस्वार तोतया पोलीसांनी मदतीचा बहाणा करून ६७ वर्षीय वृध्दाची सोनसाखळी आणि अंगठी असा लाखाचा ऐवज हातोहात लांबविल्याची घटना राजीवनगर भागात घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश भगवान परब (रा.अल्को मार्केट पाठीमागे) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. परब बुधवारी (दि.१०) फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडले होते. लक्ष्मी पिठ गिरणी समोरून ते दुपारच्या सुमारास पायी जात असतांना दुचाकीवर आलेल्या दोघा भामट्यांनी त्यांना गाठले. आम्ही पोलीस आहोत असे सांगून त्यांनी ओळखपत्रही दाखविले. यावेळी भामट्या दुकलीने या भागात गांजाविक्री चालते त्यामुळे दागिणे परिधान करून फिरू नये असा सल्ला देत पुढे गांजाची कारवाई सुरू असल्याने परब यांच्या गळयातील सोनसाखळी आणि अंगठी असा सुमारे ९९ हजाराचा ऐवज रूमालात बांधून देण्याचा बहाणा करून दागिणे हातोहात लांबविले. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक भामरे करीत आहेत.
…
बेकायदा दारू विक्री करणा-या तीघांना अटक
नाशिक : विनापरवाना बेकायदा दारू विक्री करणा-या तीघांना पोलीसांनी बेड्या ठोकल्या. संशयीताच्या ताब्यातून बिअरसह प्रिंस संत्रा नावाचे देशी मद्य साठा हस्तगत करण्यात आले असून, ही कारवाई वाघाडी परिसरात करण्यात आली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रेमचंद अरूण कौलकर (४१),शाम धनाजी शिंपी (५४) आणि आनंद धनाजी जाधव (५४ रा.तिघे वाल्मिकनगर,वाघाडी) अशी अटक केलेल्या संशयीतांची नावे आहेत. गावठीसह देशी विदेशी मद्य निर्मीती आणि विक्रीचे आगरतळ असलेल्या वाघाडीत पुन्हा विनापरवाना मद्याची विक्री होत असल्याची माहिती पंचवटी पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार वेगवेगळी पथके तयार करून पंचवटी पोलीसांनी छापा सत्र राबवून घरझडत्या घेतल्या असता संशयीताच्या घरात सुमारे दहा हजाराचा मद्यसाठा मिळून आला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात वेगवेळे गुन्हे दाखल करण्यात आले असून तीघा संशयीतांना अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस नाईक सोनवणे,खाजेकर व सानप करीत आहेत.
……
चार्जिंगला लावलेले मोबाईल चोरट्यांनी चोरले
नाशिक : खिडकीत हात घालून दोन घरातील चार्जिंगला लावलेले मोबाईल चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना सिडकोतील शिवशक्ती चौकात घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर दिपक आहिरे (रा.शिवमंदिरा शेजारी) यांनी तक्रार दाखल केली आहे. आहिरे व त्यांचे भाडेकरू वैजयंता शेलार यांच्या घरातील मोबाईलवर चोरट्यांनी डल्ला मारला. ही घटना गुरूवारी (दि.११) घडली. आहिरे व शेलार कुटूंबिय आप आपल्या कामात व्यस्त असतांना अज्ञात चोरट्यांनी उघड्या खिडकीतून हात घालून टेबलावर चार्जींगला लावलेले सुमारे ११ हजार रूपये किमतीचे दोन मोबाईल चोरून नेले. अधिक तपास हवालदार बेंडाळे करीत आहेत.
……
मालट्रकवर दुचाकी आदळल्याने मुंबईचा बुलेटस्वार ठार
नाशिक : उभ्या मालट्रकवर दुचाकी आदळल्याने मुंबईचा बुलेटस्वार ठार झाला. हा अपघात महामार्गावरील लेखानगर भागातील उड्डाणपुलावर झाला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात स्व:ताच्या मृत्युस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन मोहन मोरे (३९ रा.भोईवाडा,परेल,मुंबई) असे अपघातात ठार झालेल्या बुलेटस्वाराचे नाव आहे. मृत नितीन मोरे व तक्रारदार हेमंतकुमार वेंकप्पा करकेरा (रा.विक्रोळी,मुंबई) हे दोघे मित्र गुरूवारी (दि.११) मुंबई हून नाशिकच्या दिशेने प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. दोघे मित्र बुलेट एमएच ४८ एएन २८३६ या दुचाकीवर डबलसिट येत असतांना लेखानगर येथील सुविधा हॉस्पिटल समोरील फ्लॉय ओव्हर ब्रीजवर उभ्या असलेला मालट्रकवर एमएच ०४ डीके २४०६ भरधाव दुचाकी आदळली. या अपघातात चालक नितीन मोरे ठार झाला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बेडवाल करीत आहेत.
….