नाशिक – बेकायदेशीररित्या घातक हत्यारे जवळ बाळगणारास शहर गुन्हे शाखा दोनच्या पथकाने शिताफीने अटक करून त्याच्याकडून ३ तलवारी व ३ धारदार चाकू अशी सहा हत्यारे जप्त करण्याची कारवाई इंदिरानगर परिसरात केली.
अनुज गंगाप्रसाद विश्वकर्मा (१८, रा. अंजना लॉन्स जवळ, इंदिरानगर) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. गुन्हे शाखा दोनच्या पथकातील पोलीस नाईक मोतीलाल महाजन यांना एका युवकाकडे अवैध घातक हत्यारे असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक अजय शिंदे, सहायक आयुक्त श्रीराम पवार, उपनिरिक्षक मिथून म्हात्रे, पोलीस हवालदार यशवंत बेंडकुळे, बाळासाहेब नांद्रे, महेंद्र साळुंखे, योगेश जगताप यांच्या पथकाने सोमवारी दुपारी अंजना लॉन्स परिसरातील बिल्डींग मटेरियलच्या शॉपमधून ताब्यात घेण्यात आले. शॉपची झडती घेतली असता त्याच्याकडे धारदार तीन लवारी, तीन चाकू अशी एकुण ६ हत्यारे आढळून आली. त्याच्यावर इंदिरानगर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार अधिनियम नुसार कारवाई करण्यात आली आहे.
शहर व परिसरात युव वर्गाला सहज चाकू सारखी हत्यारे उपलब्ध होत असल्याचे वास्तव आहे. पोलीसांनी यापुर्वी कारवाया करत मोठ्या प्रमाणावर हत्यारे जप्त केली आहेत. ही हत्यारे कोठून व कशी येतात याची पाळेमुळे खोदून काढण्याचे अश्वासन पोलीस आयुक्तांनी दिले होते. मात्र याबाबत विशेष काही घडले नसल्याची स्थिती आहे.