तीन घरफोडीत दोन लाखांचा ऐवज लंपास
नाशिक : दिवाळी संपताच घरफोड्या उघडकीस येऊ लागल्या असून, मंगळवारी (दि.१७) दाखल झालेल्या तीन गुह्यात दोन लाखाचा मुद्देमालावर चोरट्यांनी डल्ला मारल्याचे वास्तव समोर आले आहे. याप्रकरणी गंगापूर,उपनगर आणि नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महात्मानगर येथील सरला रमणभाई पटेल (रा.श्रध्दा बंगला,राधीका हॉटेलजवळ) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,पटेल कुटूंबिय २ ते १३ नोव्हेंबर दरम्यान बाहेर गावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद बंगल्याचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटातून सुमारे ३० हजार रूपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिणे चोरून नेले. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार बोळे करीत आहेत. दुसरी घटना नाशिकरोड येथील मोटवाणी रोड भागात घडली. श्रध्दा श्रीराम (रा.अर्चना सोसा.शेजारी,लोकमान्यनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. श्रीराम कुटूंबिय दिवाळी निमित्त १५ ते १७ नोव्हेंबर दरम्यान बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी हॉलच्या खिडकीचे गज कापून बंगल्यात प्रवेश केला. घरात शिरलेल्या चोरट्यांनी बेडरूम आणि देवघरातील कपाटातून सोने चांदी आणि हि-याचे दागिणे असा सुमारे १ लाख ३३ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्ष परदेशी करीत आहेत. तिसरी घटना शिंदे पळसे येथे घडली. चोरट्यांनी शेतातील घराच्या पडवीत ठेवलेले धान्य आणि नागराचा फाळ चोरून नेला. याप्रकरणी संतोष रूंजा गुंड (रा.मधली गल्ली,पळसे) यांनी तक्रार दाखल केली आहे. गुंड यांचा नाशिक सहकारी साखर कारखाना रोड परिसरात शेती आहे. भाऊबिज असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी सोमवारी (दि.१७) रात्री त्यांच्या शेतातील घराच्या पडवीत ठेवलेले सुमारे १५ क्विंटल सोयाबीन आणि नागराचे फाळ असा ४५ हजाराचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार गांगुर्डे करीत आहेत.
……
खिडकीतून लॅपटॉप चोरी
नाशिक : उघड्या खिडकीत हात घालून चोरट्यांनी लॅपटॉप चोरून नेल्याची घटना सिडकोतील शिवाजीचौकात घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष नामदेव घोलप (रा.शांतीनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. शुक्रवार (दि.१३) रोजी घोलप कुटूंबिय आपआपल्या कामात व्यस्त असतांना चोरट्यांनी घराची खिडकी उघडी असल्याची संधी साधत ही चोरी केली. अज्ञात चोरट्यांनी खिडकीत हात घालून टेबलावर ठेवलेला सुमारे १२ हजार रूपये किमतीचा लॅपटॉप चोरून नेला. अधिक तपास पोलीस नाईक वरंदळ करीत आहेत.