नाशिक – भरचौकात कोयत्याने हल्ला चढवित तरूणाचा निर्घुन खून करणा-या सराईतास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. भाऊबीजच्या दिवशी देवळाली गावातील महात्मा गांधीरोड भागात ही घटना घडली होती. घटनेपासून संशयीत पसार होता. पोलीसांनी त्यास हुडकून काढले असून त्याच्याविरूध्द शहरासह ग्रामिण भागातील पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती गुन्हेशाखेने केली.
हर्ष उर्फ टोनू सुरेश म्हस्के – पाईकराव (१९ रा.शिवगंगा अपा.पाण्याच्या टाकी जवळ जेलरोड) असे अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे. रविवार (दि.१५) रोजी देवळाली गावातील योगेश पन्नालाल चायल याची महात्मागांधी रोडवर निर्घुण हत्या करण्यात आली होती. दुचाकींवर आलेल्या टोळक्याने भरचौकात योगेश चायल याचा पाठलाग करून कोयत्याने सपासप वार केले होते. त्यात त्याचा मृत्यु झाला होता. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात खूनासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीसांनी शोध घेत संशयीताच्या साथीदारांना जेरबंद केले होते. मात्र घटनेपासून तो फरार होता. पोलीस यंत्रणा त्याच्या मागावर असतांना मध्यवर्ती गुन्हे शाखेचे हवालदार गंगाधर केदार यांना मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार,सहाय्यक आयुक्त मोहन ठाकूर,वरिष्ठ निरीक्षक डॉ.सिताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक कुंदन सोनोने,हवालदार गंगाधर केदार,शिपाई सचिन सचिन आजबे,चालक दीपक पाटील,संतोष वाघ आदींच्या पथकाने मंगळवारी (दि.२३) उपनगर पोलीस ठाणे हद्दीत सापळा लावून टोनू पाईकराव यास बेड्या ठोकल्या. संशयीत सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरूध्द शहर आणि नाशिक ग्रामिण पोलीस ठाणे हद्दीत दोन बलात्कार,हाणामाºया,प्राणघातक हल्ले,लुटमार अश्या अनेक प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.