कोयत्याचा धाक दाखवून दोघांना लुटले
नाशिक : कोयत्याचा धाक दाखवून दोघा मित्रांना दुचाकीस्वार त्रिकुटाने लुटल्याची घटना तपोवनात घडली. भामट्यांनी दोघा मित्रांना मारहाण करीत मोबाईल आणि रोकड असा २१ हजाराचा ऐवज बळजबरी काढून घेत पोबारा केला असून याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेमंत राजेंद्र गाडे (१९ रा.पंचक,जेलरोड) या युवकाने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. गाडे व अविनाश कापसे हे दोघे मित्र सोमवारी (दि.२२) तपोवनात गेले होते. सायंकाळच्या सुमारास दोघे मित्र आपल्या दुचाकीवर घराकडे परतत असतांना ही घटना घडली. मनपाच्या मलशुध्दी केंद्राजवळून दोघे मित्र प्रवास करीत असतांना पाठीमागून एमएच १५ एफझेड ९८९५ या पॅशन दुचाकीवर आलेल्या त्रिकुटाने त्यांना अडविले. यावेळी संशयीतांनी कोयत्याचा धाक दाखवित दोघा मित्रांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच दोघांच्या खिशातील मोबाईल आणि रोकड असा २१ हजार १०० रूपये किमतीचा ऐवज काढून पोबारा केला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक तोडकर करीत आहेत.
…..
घरातून मोबाईल चोरी
नाशिक : उघड्या घरात प्रवेश करून चोरट्यांनी २० हजार रूपये किमतीचा मोबाईल चोरून नेल्याची घटना तिडके कॉलनीत घडली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनराज विजय क्षिरसागर (रा.गणेश अपा.एस.एस.के. हॉटेल जवळ) यांनी तक्रार दाखल केली आहे. क्षिरसागर कुटूंबिय मंगळवारी (दि.२३) आपल्या कामात व्यस्त असतांना अज्ञात चोरट्यांनी उघड्या घरात शिरून बेडरूमचा लोटलेला दरवाजा उघडून बेडवर ठेवलेला मोबाईल चोरून नेला. अधिक तपास हवालदार आडके करीत आहेत.
….
कोयताधारी तडीपार जेरबंद
नाशिक : हद्दपारीची कारवाई केलेली असतांना विनापरवाना पोलीसांच्या नाकावर टिच्चून कोयता घेवून फिरणा-या तडीपारास पोलीसांनी जेरबंद केले. ही कारवाई सिडकोतील साईग्राम गार्डन भागात करण्यात आली. यामुळे पुन्हा एकदा तडिपार गुंडाचा शहरातील वावर चर्चेस आला असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यश उर्फ बाज्या राजेंद्र पाटील (२२ रा.भोर मळा,संभाजीनगर एकलहरा रोड) असे अटक केलेल्या संशयीत तडीपाराचे नाव आहे. साईग्राम गार्डन भागात कोयताधारी फिरत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. अंबड पोलीसांनी धाव घेत कोयताधारी संशयीतास ताब्यात घेतले असता तो तडीपार गुंड असल्याचे समोर आले. संशयीताच्या ताब्यातून कोयता जप्त करण्यात आला असून याप्रकरणी पोलीस कर्मचारी राकेश राऊत यांच्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक गायकवाड करीत आहेत.
…..