कोयत्याने वार करून मारण्याचा प्रयत्न
नाशिक : डोक्यावर कोयत्याने वार करून एकास ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित राजेंद्र रामचंद्र शिंदे (रा. वडाळानाका) यांनी फिर्याद दिली असून मिलिंद भालेराव उर्फ दुल्या व अक्षय भालेराव (रा. वडाळानाका) अशी संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. १३) सकाळी साडेनऊच्या सुमारास फिर्यादी शिंदे हे नागसेन नगर येथे बौद्ध विहार समोर पिंपळाच्या झाडाखाली बसलेले होते. यावेळी संशयित मिलिंद व अक्षय हे दोघे जण मोटरसायकलवरून तेथे आले व ‘मुडदा पाडतो, ठार मारतो’ असे म्हणत शिंदे यांना शिवीगाळ व लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच संशयित अक्षय याने शिंदे यांना पाठिमागून पकडले व मिलिंद याने कोयत्याने त्यांच्या डोक्यावर कोयत्याने वार करत ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अक्षय भालेरावला ताब्यात घेतले असून हवालदार गांगुर्डे तपास करत आहे.
……..
कारच्या धडकेत मोटरसायकलस्वार जखमी
नाशिक : भरधाव कारच्या धडकेत मोटरसायकलस्वार जखमी झाला. याप्रकरणी पिडीत फरीद मुन्ने पठाण (रा. गंजमाळ) यांनी आडगाव पोलीस ठाण्यात संशयित कारचालक (एमएच २६ सी २२५९) विरुद्ध फिर्याद दिली आहे. फिर्यादी पठाणे हे मोटरसायकल क्र. (एमएच १५ आय २२६६) वरून तपोवन येथे कपीला संगमकडे जात असताना समोरून भरधाव आलेल्या कारने मोटरसायकलला धडक दिली. यात पठाण हे जखमी झाले तसेच मोटरसायकलचे देखील नुकसान झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी हवालदार कहांडळ तपास करत आहे.
——–
लोखंडी रॉडने मारहाण
नाशिक : आर्थिक व्यवहारातून झालेल्या वादातून तिघांनी एकास लोखंडी रॉडने मारहाण केली. याप्रकरणी पिडीत आकाश अशोक गांगुर्डे (रा. नांदूरनाका) याने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित नागेश शेलार व त्याच्या दोन मित्रांविरुद्ध आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० हजार रुपये दिले नाही म्हणून राग आल्याने नागेश शेलार याने त्याच्या दोन मित्रांच्या मदतीने फिर्यादी आकाशला १० मार्चला रॉडने मारहाण केली. त्यात आकाशचा उजव्या हाताचा अंगठा फॅक्चर झाला असून पाठ व हाताला मुका मार लागला आहे. याप्रकरणी हवालदार गांगुर्डे तपास करत आहे.