डोक्यात फोडली बिअरची बाटली
नाशिक : मित्रास पोलीस केस करून अडकविल्याच्या कारणातून त्रिकुटाने एकास बेदम मारहाण करीत त्याच्या डोक्यात बिअरची बाटली फोडल्याची घटना स्वराजनगर भागात घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुभाष बोराडे (रा.रामकृष्णनगर),शुभम आरगाडे व अन्य एक साथीदार अशी संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी तुकाराम महिपत मोजाड (रा.अंजना लॉन्स मागे,स्वराजनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. सोमवारी (दि.२२) ही घटना घडली. त्रिकुटाने मोजाड यांना त्यांच्या घराजवळ गाठून तीन महिन्यांपूर्वी झालेल्या वादाची कुरापत काढून तसेच मित्र अंकुश आहिरेला पोलीस केस मध्ये अडकविले या काराणातून वाद घालत शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. यावेळी संतप्त एकाने मोजाड यांच्या डोक्यात बिअर बाटली फोडून दुखापत केली. अधिक तपास हवालदार खांडेकर करीत आहेत.
…
दुचाकींच्या अपघातात एक ठार
नाशिक : भरधाव दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात एक जण ठार झाला. हा अपघात त्र्यंबकरोडवर झाला असून अपघातानंतर दोघे चालक आपली वाहणे घेवून पसार झाली आहेत. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भटू फकिरा गांगुर्डे (५२ रा.ओमनगर,दसक जेलरोड) असे अपघातात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे. गांगुर्डे ३ मार्च रोजी अनोळखी दुचाकीस्वारासमवेत डबलसिट सातपूर येथून ठक्कर बाजारच्या दिशेने प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. त्र्यंबकरोडवरील मायको सर्कल परिसरातील गजानन पाणी टँकर समोर पाठीमागून भरधाव आलेल्या अज्ञात दुचाकीने पुढे जाणाºया दुचाकीस धडक दिली. या अपघातात पुढे जाणा-या दुचाकीवर पाठीमागे बसलेले गांगुर्डे गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर दोघे दुचाकीस्वार आपली वाहणे घेवून पसार झाल्याने परिसरातील नागरीकांनी त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल केले असता सोमवारी (दि.२२) त्यांचा मृत्यु झाला. अधिक तपास उपनिरीक्षक बैरागी करीत आहेत.