नाशिक : बँक खातेदाराचे डेबिट कार्ड क्लोनिंग करीत परप्रांतीय भामट्यांनी एक लाख रूपये परस्पर काढून घेतल्याचा प्रकार नाणेगाव ता.जि.नाशिक येथे घडला. सदरची रक्कम झारखंड राज्यात काढण्यात आली असून, याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशान्वये देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात फसवणुक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सागर चंद्रकांत जाधव (रा.कारखाना रोड दे.कॅम्प) यांनी तक्रार दाखल केली आहे. जाधव स्टेट बँक आॅफ इंडिया नाणेगाव शाखेचे व्यवस्थापक आहे. नाणेगाव शाखेतील खातेदार सोमनाथ बाबुराव लांडगे यांच्या बँक खात्यातून परस्पर एक लाख रूपयांची रक्कम परस्पर काढण्यात आली होती. ही घटना ६ मार्च २०१९ रोजी घडली होती. लांडगे यांच्या ही बाब निदर्शनास येताच त्यांनी बँकेशी संपर्क साधला होता. अज्ञात भामट्यांनी लांडगे यांचे डेबिट कार्ड क्लोनिंग द्वारे नव्याने तयार करून रक्कम परस्पर काढली होती. बँकेच्या तपासणीत सदरची रक्कम देवघर (झारखंड) येथील स्टेट बँकेच्या एटीएममधून काढण्यात आली होती. लांडगे यांनी बँकेकडे पाठपुरावा करूनही दखल न घेतली गेल्याने अखेर त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक देशमुख करीत आहेत.