नाशिक : समग्र शिक्षा अभियान, रोटरी क्लब ऑफ नाशिक आणि सेतुबंध यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा गणेशगाव येथे शाळेसाठी खोल्या बांधून देण्यात येणार आहेत. या नूतन इमारतीचे भूमिपूजन नुकतेच पार पडले.
जिल्हा परिषद शाळा गणेशगाव येथे परिसरातील शेकडो विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र, यथील शाळेचा काही भाग नादुरुस्त असल्याने मुलांना बसण्यासाठी पुरेशी जागा होत नाही. या पार्श्वभूमीवर परिसरातील मुलांची शिक्षणाची गैरसोय दूर होऊन, येथे करण्यात येणारे बांधकाम उच्च दर्जाचे, दर्जेदार आणि तांत्रिकदृष्ट्या व्यवस्थित आणि वेळेत पूर्ण व्हावे या अनुषंगाने रोटरी क्लब ऑफ नाशिक एक दुवा म्हणून काम करणार आहे. शाळेच्या या इमारतीचा भूमिपूजन समारंभ नुकताच पार पडला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात बोलताना रोटरी क्लबच्या अध्यक्षा मुग्धा लेले म्हणाल्या, सर्वांच्या सहकार्याने केलेले हा अभिनव पथदर्शी प्रकल्प ठरेल. प्रोजेक्ट डायरेक्टर सचिन बागड यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. टपारीया टूल्स कंपनीच्या सीएसआरची मदतही या शाळेस झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुग्धा लेले होत्या. मुख्य अतिथी म्हणून सेक्रेटरी विजय दिनानी, सचिन बागड, निलेश सोनजे, प्रफुल्ल बरडिया, रामनाथ जगताप, प्रशांत पाटिल, अग्रवाल, सरपंच कचरू डहाळे, संजय वाघ, मुख्याध्यापक सुभाष साईनकर, केंद्रप्रमुख कदम, दत्ताभाऊ ढगे, जि.प.बांधकाम अभियंता चाटोरीकर आदी मान्यवर तसेच गणेशगाव ग्रामस्थ उपस्थित होते. शाळेच्या कायापालटाचे नियोजन सेतुबंध ग्रूपचे संस्थापक पंकज दशपुते यांनी प्रास्ताविकाद्वारे सादर केले. या शाळेच्या बांधकामास सुरुवात झाली असून, येत्या तीन महिन्यात काम पूर्णत्वास जाण्याची शक्यता आहे. या कामास सर्वतोपरी सहकार्य करण्याचे अश्वासन स्थानिक गावकऱ्यांनी दिले. दानशूर व्यक्तिमत्व पुंडलिकराव कापसे यांनी शाळेस पाच हजाराची देणगी जाहीर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन हेमंत पाटील यांनी केले. मुख्याध्यापक सुभाष साईनकर आभार यांनी मानले.