नाशिक – जिल्हाभरात गेली काही दिवसांपासून सातत्याने अतिवृष्टी होत असल्याने शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर संसदेचे अधिवेशन आटोपून मतदार संघात परतताच तातडीने भ्रमणध्वनीद्वारे संपुर्ण दिंडोरी लोकसभा मतदार संघातील नुकसानीचा खासदार डॉ. भारती पवार यांनी आढावा घेतला. अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराने बऱ्याच गावांचा संपर्क तुटला असून अनेकांची घरे तसेच रस्ते पावसाच्या पाण्यात वाहुन गेले आहेत. शेतातील उभी पीके पावसाच्या पाण्याखाली गेल्यामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच काही भागांत ढगफुटी सदृश्य परिस्थिती उद्भवल्याने उभ्या पिकांसह शेत वाहून गेले आहे. त्याचबरोबर डॉ. पवार यांनी या परिस्थितीची चौकशी केली असता नुकसानींचे पंचनामे होत नसल्याच्या अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
अगोदरच कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला असून त्यांचे जीवनमान विस्कळीत झाले आहे. निसर्गाने देखील अवकृपा केल्याने शेतकरी हतबल झाला आहे ही अतिशय गंभीर बाब आहे. जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे, घरांचे व रस्त्यांसह आदी भागांचे तीव्र नुकसान पाहता जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी डॉ. पवार यांनी केली आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट नुकसान भरपाई मिळणेकामी राज्याचे मुख्यमंत्री व कृषीमंत्री यांचेकडे पत्राद्वारे त्यांनी विनंती केली आहे.