नाशिक – जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी कांद्याचे लिलाव ठप्प आहेत. केंद्र शासनानं कांदा साठवणूक करण्यावर मर्यादा घातली असून २५ मेट्रिक टनापेक्षा अधिक कांद्याची साठवण करता येणार नाही असा निर्णय घेतल्यानंतर व्यापारी वर्गानं नाराजी व्यक्त केली आहे. अगोदर साठवलेला कांदा विकल्या शिवाय नवीन कांदा लिलाव घेणार नाही अशी भूमिका या व्यापारी वर्गानं घेतली आहे.
त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील १२ प्रमुख बाजार समित्यांमध्ये कालपासून कांदा लिलाव बंद आहेत. नाशिकचे सहकार उपनिबंधक सतीश खरे यांनी काल बाजार समित्यांना पत्र दिल्यानंतरही व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही. बाजार समित्या मात्र नियमित सुरू आहेत.
दरम्यान, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापारी प्रतिनिधी आणि बाजार समिती संचालक यांच्यात बैठक होत असून त्यात काही निर्णय होण्याची शक्यता आहे.