नाशिक – जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यात जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांची मूदतपूर्व बदली करण्यात आली आहे. त्यांच्याकडे विभागीय सहनिबंधक कार्यालयातील पदभार देण्यात आला आहे. तर, नाशिक जिल्हा उपनिबंधक पदी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश खरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही बदली अचानक का करण्यात आली याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.
अखेर मुंडावरे यांची नियुक्ती
गेल्या अनेक महिन्यांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे यांच्याकडे रोजगार हमीचा पदभार देण्यात आला आहे. नाशिक महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश आले. त्यात मुंडावरे यांचा समावेश आहे. तर, रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ यांची अहमदनगर येथील जिल्हा पुनर्वसन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, नंदुरबारच्या निवासी उपजिल्हाधिकारीपदी सुधीर खांदे तर नंदुरबार रोहयो उपजिल्हाधिकारीपदी शाहूराव मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.