याबाबत केंद्र शासनाने १३ नोव्हेंबर रोजी राज्य शासनाला लेखी पत्राव्दारे सुचना दिल्या असून स्वच्छ भारत अभियानाची प्रभावी अंमलबजावणी केल्याबाबत नाशिक तसेच कोल्हापूर जिल्हयाचा विशेष पुरस्काराने सन्मान करण्यात येणार असल्याचे कळविले आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, व राज्यमंत्री रतनलाल कटारिया यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीव्दारे १९ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ११.३० वाजता हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) ही केंद्र पुरस्कृत महत्वाकांक्षी योजना यांच्यामार्फत पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत राबविण्यात येत आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालयांच्या बांधकाम व वापरासाठी जनजागृती करण्यात येते तसेच सार्वजनिक शौचालय, सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन, प्लॅस्टिक बंदी, शुध्द पाणी आदि घटकांवर काम करण्यात येते. केंद्र शासनाने जुलै, २०२० मध्ये स्वच्छ भारत मिशन टप्पा-२ च्या मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या असून, सदर मार्गदर्शक सूचनांनुसार या योजनेंतर्गत कार्यवाही करावयाची आहे. संपूर्ण ग्रामीण स्वच्छता व स्वच्छता शाश्वत टिकविण्याच्या अनुषंगाने स्वच्छ भारत मिशन (ग्रा) दुसऱ्या टप्प्यांतर्गत ग्रामीण भागातील घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाचे नियोजन करण्यात येत आहे. सध्याच्या कोविड १९ सारख्या संसर्गजन्य रोगावर प्रतिबंधात्मक उपाययोजनेत संपूर्ण स्वच्छतेचे अनन्य साधारण महत्व असल्याने ग्रामीण भागात ग्रामसेवक तसेच स्वच्छाग्रहींमार्फत शौचालयाचा नियमित वापर, हात धुणे, वैयक्तिक स्वच्छता याबाबत काम करण्यात येत असल्याची माहिती पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी दिली.
राष्ट्रीय पुरस्कार मिळणे ही अभिमानाची बाब
नाशिक जिल्हयात पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने पाणी व स्वच्छतेबाबत जनजागृतीसाठी काम करण्यात येत आहे. कोविडच्या काळातही हात धुण्याबाबत जनजागृती, शौचालयाचा वापराबाबत जनजागृती करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषद सदस्य यांनीही स्वच्छतेविषयी विविध उपक्रमात सहभाग घेतला आहे. नाशिक जिल्हयातील कामांची दखल घेऊन केंद्र शासनाने जिल्हयास पुरस्कार जाहिर केला ही अतिशय अभिमानाची बाब आहे.
– बाळासाहेब क्षिरसागर, अध्यक्ष, जिल्हा परिषद नाशिक
सर्वांच्या योगदानाने जिल्हयाचा सन्मान
नाशिक जिल्हयाला राष्ट्रीय स्वरुपाचा पुरस्कार मिळणे ही अतिशय आनंदाची बाब आहे. गेल्या काही महिन्यांपासून पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने गंदगीमुक्त भारत मोहिम, स्वच्छता हीच सेवा अभियान, हात धुवा दिन, जलकुंभ स्वच्छता अभियान, कोविड काळात स्वच्छतेविषयक जनजागृती आदि स्वरुपाचे उपक्रम राबविण्यात आले आहेत.सर्व तालुक्याचे गट विकास अधिकारी तसेच जिल्हा परिषदेच्या विविध विभागांनीही यासाठी योगदान दिले असून सर्वांच्या योगदानाने जिल्हयाला बहुमान प्राप्त झाला आहे. केंद्र शासनाने या कामांची दखल घेवून देशातून नाशिक जिल्हयाची यासाठी निवड करणे ही निश्चितच सन्मानाची बाब आहे.
लीना बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक