जर्मनीत शिक्षणाच्या बहाण्याने सात लाखांची फसवणूक
नाशिक : जर्मनीत उच्च शिक्षण घेण्यासाठी आवश्यक सर्टिफिकेट मिळवून देण्याचे अमिष दाखवत तरुणास ७ लाख ६ हजार ८३८ रुपयांना आॅनलाइन गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी राजेंद्र गोविंद सोनवणे (रा. मराठा नगर, जेलरोड) याने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोनवणे याला २१ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२० या कालावधीत दोन वेगवेगळ्या नंबर फोन आले, व जर्मनी देशात जावून उच्च शिक्षण घेण्यासाठी आवश्यक असलेले आयईएलटीएस परीक्षेचे सर्टिफिकेट व इतर कागदपत्र मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी पैशाची मागणी केली. सर्टिफिकेटच्या लालचेने सोनवणे याने फोन करणा-या व्यक्तीस ७ लाख ६ हजार ८३८ रुपये आॅनलाइन पाठवले. मात्र, तरीही सर्टिफिकेट न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सोनवणे याने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. दरम्यान सोनवणे यास ज्या दोन नंबर वरून फोन आले ते उत्तरप्रदेशमधील वाराणसी येथील असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलीस निरिक्षक देवराज बोरसे तपास करत आहे.
————————–
बनावट दागीण्यांप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल
नाशिक : गहाण म्हणून ठेवलेले सव्वातीन लाख रुपये किमतीचे दागीने बनावट निघाल्याने न्यायालयाच्या आदेशाने संशयिताविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी नरेश बाबुलाल शाह (रा. गंजमाळ) यांनी प्रथम पोलीस ठाणे आणि नंतर न्यायालयात अर्ज केला होता. त्यानंतर न्यायालयाने सीआरपीसी १५६(३) अन्वये आदेश दिल्याने संशयित अंकुश राजेश जळगावकर (रा. पोर्णिमा स्टॉपजवळ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, ५ मे २०२० रोजी संशयित अंकुश जळगावकर याने सहा अंगठ्या, एक पाटली, एक ब्रेस्लेट, एक नेकलेस, दोन वेल, एक चेन, मणी, वाटी, बोरमाळ असे दागीने सोन्याचे असल्याचा विश्वास देत फिर्यादी शाह यांच्याकडून ३ लाख २७ हजार ३०० रुपयांचे कर्ज घेतले. काही दिवसानंतर फिर्यादी शाह यांनी संशयिताकडे मुद्दल व व्याजाची मागणी केली असता त्याने देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे फिर्यादी शाह यांनी २५ जुलै २०२० ते दागीने विक्रीसाठी सराफाकडे नेले असता दागीने सोन्याचे नसल्याचे समजले. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शाह यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. मात्र, या प्रकरणी दाखलपात्र गुन्हा नोंदवला न गेल्याने शाह यांनी न्यायालयात अर्ज दिला. त्यामुळे न्यायालयाने आदेश दिल्यानंतर सोमवारी (दि. ११) संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी सहायक पोलीस निरिक्षक व-हाडे तपास करत आहे.
———–
शहरातून चार मोटारसायकली चोरी
नाशिक : शहर परिसरात मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच आहे. मोटारसायकल चोरीप्रकरणी सोमवारी (दि. ११) विविध पोलीस ठाण्यांमध्ये चार गुन्हे दाखल झाले आहे. घराच्या पार्किंगमध्ये पार्क केलेली मोटारसायकल चोरी गेल्याप्रकरणी सुुजित मनोहर ढोबळे (रा. शिवाजीनगर) याने दिलेल्या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सुजित याने ८ जानेवारी रोजी त्यांची मोटारसायकल क्र. (एमएच १५ डीडब्ल्यू ८९१७) घराच्या पार्किंगमध्ये पार्क केली असता अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली. दुस-या घटनेत रोहित रामजी चव्हाण (प्रसाद सर्कल जवळ) याची अॅक्टिवा क्र. (एमएच १५ एचडी ३५८३) अज्ञाताने चोरून नेली. रोहितने २९ डिसेंबर २०२० रोजी त्याची अॅक्टिवा संजय टी स्टॉल, सावरकर नगर येथे उभी केली असता अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली.
तिसरी घटना पाथर्डी शिवारात घडली. याप्रकरणी रुस्तुम कान्होजी मोरे (रा. भुजबळ फार्म जवळ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोरे यांनी ८ जानेवारीला त्यांची मोटारसायकल क्र. (एचएच १५ डीएन ०९५४) गौळाणे फाटा येथे पार्क केली असता अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली.
चौथ्या घटनेप्रकरणी सुमित श्रीगोपीचंद्र जयस्वाल (रा. दत्त नगर, चुंचाळे) याने अंबड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सुमित याने त्यांची मोटारसायकल क्र. (एचएच १५ जीयू ६१०२) घराजवळ पार्क केली होती. यावेळी त्यांची ही ७५ हजार रुपये किंमतीची मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली.
—————
वाहनाच्या धडकेत मोटारसायकल चालकाचा मृत्यू
नाशिक : अज्ञात वाहनाने कट मारल्याने अपघातात जखमी झालेल्या मोटारसायकल स्वाराचा मृत्यू झाला. देवेंद्र मधुकर नेरकर (रा. सुविचार हॉस्पिटल समोर) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी ज्ञानेश सुधाकर थोरात (रा. अशोका मार्ग) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, देवेंद्र नेरकर हे ३ जानेवारीला सकाळी एक्स्लो पॉँइंट येथून जात असताना त्यांच्या मोटारसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने नेरकर यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सहायक पोलीस उपनिरिक्षक शेळके तपास करत आहे.
———
कापड दुकान फोडले
नाशिक : कापड दुकानाच्या शटरचे लॉक तोडून २५ हजार रुपयांचे कपडे चोरून नेल्याची घटना त्रिमुर्ती चौक परिसरात घडली. याप्रकरणी संतोष अशोक पगारे (रा. दुर्गानगर, कामठवाडे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, ६ जानेवारीच्या रात्री अज्ञात चोरट्याने पगारे यांच्या दुकानाच्या शटरचे लॉक तोडून आतमध्ये प्रवेश केला, व गल्ल्यातील अडीच हजार रुपयांची रोकड, १० हजार रुपये किंमतीच्या २० साड्या, ३ हजार रुपये किंमतीचे १५ लेडीज टॉप, २ हजार रुपये किंमतीचे लेडीज प्लाझो, दीड हजार रुपये किंमतीचे गारमेन्टस बॉक्स, ६ हजार रुपये किमतीचे लहान मुलांचे कपडे असा एकूण २५ हजार रुपये किंमतीचा माल चोरून नेला.
——–
लाकडी दांडक्याने मारहाण
नाशिक : गाडी आडवून एकास शिवीगाळ व लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी गणेश तुकाराम शेलार (रा. कॅनोल रोड, जेलरोड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित समाधान नीलेश शेलार (रा. जेलरोड) याच्याविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रविवारी (दि. १०) सायंकाळी संशयित समाधान याने फिर्यादी गणेशची गाडी आडवुन त्यास शिवीगाळ व दमटाटी केली तसेच लाकडी दांडक्याने डोक्यात मारहाण करून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे