नाशिक : दिंडोरी रोडवरील गीता नगर येथे अज्ञात चोरट्याने मोबाइल व सोन्याच्या बांगड्या असा एकूण १ लाख ८२ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. फ्लॅटच्या खिडकीतून हात टाकत ही चोरी करण्यात आली. याप्रकरणी रुचिता मयूर जैन (रा. पुणे) यांनी फिर्याद दिली असून म्हसरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास अज्ञात चोरट्याने ही चोरी केली. गिता लक्ष्मी अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये केली. या प्लॅटच्या बेडरुमची खिडकी उघडी होती. याचा फायदा घेत चोरट्यांनी खिडकीतून हात टाकत तीन मोबाइल व १ लाख ६५ हजार रुपये किंमतीच्या ५.५ तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या असा एकूण १ लाख ८२ हजार रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक भडीकर तपास करत आहे.
….
भांडण सोडवणे पडले महागात
नाशिक : भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांना भांडण सोडवणे चांगलेच महागात पडले. भांडण करणा-यांनीच त्यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी गोविंद शामराव कांकरीया (रा. मेनरोड) यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरुन मारहाण करणा-या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. २) रात्री साडेनऊच्या सुमारास ठाकरे रोडवर संशयितांचे भांडण सुरू होते. गोविंद कांकरीया व त्यांचा मित्र अमित आरोटे यांनी ते भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. त्याचा राग आल्याने भांडण करणा-यांनीच फिर्यादी व त्यांच्या मित्राला मारहाण व शिवीगाळ केली.