चेहडी पंपिंग येथे ५५ हजाराची घरफोडी
नाशिक : चेहडी पंपिंग येथील दत्तनगर भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी ५५ हजाराचा ऐवज चोरून नेला. त्यात सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विरभान शालीग्राम आहिरे (रा.मराठा कॉलनी,दत्तनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. आहिरे कुटूंबिय १६ ते १९ जानेवारी दरम्यान बाहेर गावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून लोखंडी कपाटाच्या लॉकरमधून सुमारे ५५ हजार रूपये किमतीचे अलंकार चोरून नेले. अधिक तपास उपनिरीक्षक भालेराव करीत आहेत.
….
एनडीसीमागे एकाची आत्महत्या
नाशिक : जिल्हा बँकेच्या पाठीमागील सोसायटीत राहणा-या ४५ वर्षीय व्यक्तीने आपल्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. सदर इसमाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
अजय विजय पांडे (मुळ रा.मनमाड,हल्ली अतुल पार्क एनडीसी बँके मागे) असे आत्महत्या करणा-या व्यक्तीचे नाव आहे. पांडे यांनी गुरूवारी (दि.२१) आपल्या राहत्या घरात आतून कडी लावून घेत बेडरूममध्ये नॉयलॉन दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी तुषार आव्हाड यांनी दिलेल्या खबरीवरून मुंबईनाका पोलीसात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार सुनिल आहिरे करीत आहेत.
….
अनोळखी मृतदेहाबाबत पोलीसांचे आवाहन
नाशिक : रेल्वे अपघातात ठार झालेल्या ४० ते ५० वयोगटातील अनोळखी इसमाच्या मृतदेहाची अद्याप ओळख पटली नसून नातेवाईक अथवा माहितगारांनी संपर्क साधावा असे आवाहन आडगाव पोलीसांनी केले आहे. हा अपघात ओढा रेल्वे लाईनवर झाला होता.
४५ ते ५० वयोगटातील अनोळखी व्यक्तीचा रेल्वेच्या धडकेत मृत्यु झाला. हा अपघात बुधवारी (दि.२०) सायंकाळच्या सुमारास झाला होता. सदर व्यक्ती रंगाने सावळा असून त्याने अंगात जांभळया रंगाचा शर्ट आणि काळया रंगाची पॅण्ट व स्वेटर परिधान केलेले आहे. याबाबत स्टेशन मास्तर एस.एस.ब्रम्हक्षत्रीय यांनी दिलेल्या खबरीवरून मृत्युची नोंद करण्यात आली असून सदर इसमाबाबत माहिती असल्यास पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन हवालदार एस.आर.गांगुर्डे यांनी केले आहे.
………..