नाशिक – कोरोना काळात सुरुवातीला तीन-चार महिने काही गैरसमज असल्यामुळे तसेच पशु पक्ष्यांचे मांस खाल्ल्याने संसर्गजन्य आजारांचा फैलाव होतो, यासारख्या गैरसमजामुळे मांसाहारी खवय्यांनी मटना बरोबर चिकन खाण्याकडे देखील पाठ फिरवली होती, त्यानंतर श्रावण महिना सुरु झाला, त्या पाठोपाठ पितृपक्ष आला. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिक आणि अंडी विक्रेते यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र आता साथीच्या आजारांबाबत योग्य जनजागृती झाल्यामुळे प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून चिकन आणि अंडी खाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिक आणि अंडी विक्रेते यांना देखील आता पुन्हा अच्छे दिन आले आहेत. पुर्वी दोन ते तीन रुपयांना मिळणारे अंडे आता पाच ते सहा रुपयांना उपलब्ध होत आहे.
या संदर्भात अधिक माहिती देताना या व्यवसायातील जाणकारांनी सांगितले की, ग्रामीण भागात कुक्कुटपालन ( पोल्ट्री ) हा एक जोडधंदा आहे. काही लोक खूप चांगले पैसे कमावतात. मात्र परंपरागत पद्धतीनेच त विचार न करता जोडधंदा हा शब्द बाजूला सारून मुख्य व्यवसाय म्हणूनच यामध्ये पडावे लागते. कारण, शेती असो की शेती आधारित व्यवसाय असोत, त्यामधील गुंतवणूक मोठी असते. आपल्या आर्थिक क्षमतेनुसार आणि बँक किंवा अनुदान योजनेची जोड देऊन याबाबतीत निर्णय घ्यावा लागतो. यामध्ये कोट्यवधी रुपये कमावल्याच्या बातम्या आपण वाचतो. परंतु, काही वेळा मोठे नुकसान देखील सोसावे लागते. यंदा मार्च ते जुलै, ऑगस्ट दरम्यान पाच -सहा महिन्यात केवळ जिल्हयात नव्हे तर राज्यभरातील पोल्ट्री व्यवसायिकांना प्रचंड तोटा सहन करावा लागला. या दरम्यान काहींना तर लाखो अंडी व हजारो कोंबडया फुकट वाटल्या तर काहींना फेकून सुध्दा दयाव्या लागल्या. आता मात्र यात चांगली सुधारणा होत आहे.