नाशिक : आॅनलाईन वाहन बुक करून प्रवासाच्या बहाण्याने चार जणांच्या टोळक्याने चालकास बेदम मारहाण करीत व बळजबरीने मोबाईल काढून घेत कार पळवून नेल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात लुटमार व अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुल प्रदिप फेगडे (२८, रा. उत्तमनगर, सिडको) या चालकाने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. फेगडे सिडकोतील राज पाटील यांच्या मालकीच्या वेरीटो (एमएच १५ ई ७८३७) या प्रवासी वाहतूक करणा-या कारवर चालक आहेत. ओला कंपनीच्या माध्यमातून या कारमधून प्रवासी वाहतूक केली जात असून मंगळवारी (दि.२४) सायंकाळी सिन्नर येथे जाण्याची बुकींग मिळाल्याने फेगडे कार घेवून प्रवाशांना घेण्यासाठी पंचवटीतील मंडलीक मळा भागात गेले होते. या ठिकाणी चार प्रवासी वाहनात बसले. सिन्नरच्या दिशेने जात असतांना संशयीतांनी शिर्डी येथे जाण्याचा आग्रह धरला. रात्री फेगडे यांनी शिर्डी गाठली असता संशयीतांनी निर्जनस्थळी नेवून त्यांच्याकडे तीस हजाराची मागणी केली.याप्रसंगी संशयीतांनी हातपाय बांधून त्यांना बेदम मारहाण केली. तसेच राहता,कोपरगाव,श्रीरामपूर आदी भागात फिरवून त्यांच्या खिशातील मोबाईल बळजबरीने काढून घेत फेगडे यांना रस्त्यावर उतरवून दिले. त्यानंतर संशयीतांनी कार घेवून पोबारा केला असून कसे बसे घर गाठून फेगडे यांनी पोलीसात धाव घेतली आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गिरी करीत आहेत.
………
बाजारात महिलेची पोत लंपास
नाशिक : भाजीपाला खरेदीसाठी गेलेल्या महिलेच्या गळयातील सोन्याची पोत भामट्या महिलांनी हातोहात लांबविल्याची घटना जत्रा हॉटेल परिसरात घडली. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निता प्रमोद कदम (४३, रा. गजनान पार्क, जत्रा हॉटेल समोर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. निता कदम गुरुवारी (दि.२६) भाजीपाला खरेदीसाठी जत्रा हॉटेल ते कोकण कट्टा या भागात भरणा-या बाजारात गेल्या होत्या. रस्त्यावर भरलेल्या भाजी बाजारात भाजीपाला खरेदी करीत असतांना अज्ञात दोन महिलांनी गर्दीची संधी साधत कदम यांच्या गळयातील सुमारे २८ हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत हातोहात लांबविली. अधिक तपास पोलीस हवालदार देशमुख करीत आहेत.
…….
इमारतीवरून पडल्याने अल्पवयीन मुलीचा मृत्यु
नाशिक : इमारतीवरून पडल्याने बारा वर्षीय मुलीचा मृत्यु झाल्याची घटना चेतनानगर भागात घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. विश्वा रोहिदास बाविस्कर (रा.श्री तिरूमला आशियाना सोसा.चेतनानगर) असे मृत मुलीचे नाव आहे. इमारतीच्या आवारात खेळण्याच्या सुविधा असल्याने विश्वा बुधवारी (दि.२५) रात्री आई वडिलांना विचारून खेळण्यासाठी घराबाहेर पडली होती. अल्पावधीतच इमारतीवरून कुणी तरी पडल्याचा आवाज आल्याने कुटूंबियांनी धाव घेतली असता विश्वा रक्ताच्या थारोळयात पडली होती. कुटूंबियांनी तिला तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास सहायस निरीक्षक भामरे करीत आहेत.
…….
अंगावर काच पडल्याने कामगार ठार
नाशिक : कारखान्यात काम करीत असतांना अंगावर काच पडल्याने २८ वर्षीय कामगार ठार झाल्याची घटना औद्योगीक वसाहतीतील स्लाईड वेल कारखान्यात घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
अमोल भिकन कोळी (२८, रा. राणाप्रताप चौक, सिडको) असे मृत कामगाराचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार कोळी अंबड औद्योगिक वसाहतीतील स्लाईडवेल कारखान्यात नोकरीस होता. गुरूवारी (दि.२६) स्टोर विभागात काम करीत असतांना ही घटना घडली. स्टोर विभागातील काच अचानक अंगावर पडल्याने अमोल कोळी जखमी झाला होता. अन्य कामगारांनी त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार भड करीत आहेत.