नाशिक : चारित्र्यांच्या संशयातून पत्नीस पेटवून देत तिची हत्या केल्याप्रकरणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश ए.एस.वाघवसे यांनी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ही घटना १२ जून २०१८ रोजी ध्रुवनगर भागात घडली होती.
समशेर अबलेश देवांग साय (रा.एकदंत हाईटस नवीन बांधकाम साईट,ध्रुवनगर शिवाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे. मुळचा नेपाळ येथील समशेर साय हा नव्याने बांधकाम सुरू असलेल्या सोसायटीचा सुरक्षा रक्षक होता. बांधकाम व्यावसायीकाने राहण्यासाठी बांधकाम साईटवरच व्यवस्था केल्याने साय हा पत्नी आयषा समवेत तेथेच वास्तव्यास होता. साय दांम्पत्यात चारित्र्याच्या संशयातून नेहमी खटके उडत, १२ जून रोजी याच कारणातून दोघांमध्ये वाद झाला. संतप्त झालेल्या साय याने पत्नी आयशा हिस मारझोड करीत ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिले होते. त्यात तिचा मृत्यु झाला.
याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालिन वरिष्ठ निरीक्षक किशोर मोरे यांनी गुह्याचा तपास करून पुराव्यानिशी दोषारोपपत्र जिल्हा न्यायालयात सादर केले होते. हा खटला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयात चालला. सरकारतर्फे अॅड. शिरीष कडवे यांनी काम पाहिले. त्यांना गंगापूरचे पोलीस कर्मचारी जी.अे.पिंगळे,अमलदार एस.यू.गोसावी आणि एस.सी.शिंदे आदींना सहाय्य केले. न्यायालयाने फिर्यादी,साक्षीदार,पंचानी दिलेल्या साक्ष ग्राह्य धरून समशेर साय यास जन्मठेप आणि एक हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.