नाशिक : चायनीज पदार्थ बनवण्यास उशीर झाल्याच्या कारणातून चिडून जाऊन तिघांनी गॅसवरील गरम कढई हातगाडी चालकाच्या अंगावर ढकलून दिल्याने यामध्ये भाजून तो जखमी झाल्याची घटना द्वारका परिसरात शुक्रवारी दि.२० रात्री घडली. अनिल अशोक काळुंके, जीवन विल्सन श्रीसुंदर (रा. समतानगर, टाकळी), भैया (पूर्ण नाव नाही, ) अशी संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी तन्वीर निसार मन्सुरी (२०, रा. पखाल रोड, जुने नाशिक ) याने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार द्वारका हॉटेलच्या बाजूला सर्व्हिस रोडवर तन्वीर याचा चायनीज पदार्थांचा हातगाडा आहे. या ठिकाणी संशयित मंच्युरियन खाण्यासाठी आले होते. ते बनवण्यास उशीर झाल्याच्या रागातून संशयितांनी वाद घालत गरम कढई तन्वीर याच्या अंगावर ढकलून दिली. यामध्ये तन्वीर १५ टक्के भाजून जखमी झाला. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक : पोलिसांत तक्रार देण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेच्या घरात टोळक्याने तोडफोड केल्याचा प्रकार शुक्रवारी (दि.२०) पंचवटीतील सम्राटनगर येथे घडली. सनी ऊर्फ बाळा उत्तम निपळुंगे, अतिश बोडके व त्यांचे दोन मित्र अशी संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी विमल मधुकर बागूल (६५, रा. सम्राटनगर, पंचवटी) यांनी तक्रार दाखल केली आहे. संशयितांविरोधात तक्रार करण्यासाठी बागूल या पंचवटी पोलीस ठाणे येथे जात असताना पाठीमागे संशयितांनी बळजबरी त्यांच्या घरात घुसून काचा फोडून इतर वस्तूंची तोडफोड केली. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक कुलकर्णी करत आहेत.
तीन दुचाकी लंपास
नाशिक : शहरात वाहनचोरीचे सत्र सुरूच असून, विविध ठिकाणांवरून तीन दुचाकी चोरीला गेल्याचे प्रकार समोर आले आहेत. या प्रकरणी पंचवटी, भद्रकाली व मुंबई नाका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
रामकुंडावर गाडीपासून काही अंतरावर मित्रांबरोबर गप्पा मारणा-याची गाडी चोरट्यांनी लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पेठ रोड परिसरात राहणारे रूपेश दगडू कुमावत यांनी तक्रार दाखल केली आहे. १३ नोव्हेंबरला ते रामकुंड येथे मित्राला भेटण्यासाठी आले असता जवळच एमएच १५, डीवाय ६५३३ ही दुचाकी पार्क करून मित्राशी गप्पा मारत होते. या कालावधीत चोरट्याने दुचाकी लंपास केली. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
भद्रकालीतील बादशाही कॉर्नर येथे शुक्रवारी (दि.२०) पार्क केलेली एमएच १५, जीवाय ३६९२ ही दुचाकी चोरट्यांनी पळवली. या प्रकरणी अंबड येथील गणेश साहेबराव देशमुख यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तिसरी घटना पखाल रोड परिसरात घडली येथील विश्वास बँकेच्या जवळ पार्क केलेली दुचाकी एमएच १४, बीयू २०७० ही अज्ञात चोरट्याने शुक्रवारी रात्री चोरून नेली. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तरुणीचा विनयभंग
नाशिक : रस्त्याने पायी चाललेल्या तरुणीला अडवत एकाने विनयभंग केल्याची घटना शुक्रवारी (दि.२०) सकाळी जुना आडगाव नाका परिसरात घडली. उदय जयंत जगताप (१८, रा. वाल्मीकनगर, पंचवटी) असे संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरूणी शुक्रवारी सकाळी आडगाव नाक्याकडून – निमाणी बसस्थानकाकडे चालत येत असताना दुचाकीवर आलेल्या संशयिताने पांजरपोळ परिसरात तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत प्रेमाची मागणी केली. तरुणीने नकार देताच त्याने तिचा हात पकडून विनयभंग केला. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक : रिक्षाने प्रवास करणार्या महिलेच्या पर्समधील दागिने रिक्षाचालकाने लंपास केल्याची घटना ठक्कर बाजार परिससरात शुक्रवारी रात्री घडली. या प्रकरणी सुजाता आशोक सुर्वे (३५, वसंतगड, ता. कराड, जि. सातारा) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार सुर्वे या शिवाजीनगर येथे जाण्यासाठी ठक्कर बाजार येथून पाठीमागील बाजूस समर्थ असे नाव असलेल्या रिक्षात बसल्या. संशयित चालकाने ठेवण्यासाठी त्यांच्याकडील पर्स स्वतःजवळ घेतली. दरम्यान त्यातील ५.६ ग्रॅम वजनाचे दागिने व दोन हजारांची रक्कम काढून घेत तो पसार झाला. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरमालकावर चाकू हल्ला
नाशिक : घरभाडे मागण्यास आलेल्या मालकावर एकाने चाकू हल्ला केल्याची घटना शनिवारी (दि.२१) औजिनाथ झोपडपट्टी येथे घडली. विशाल विखे-पाटील, त्याची आई व बहीण अशी संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी मयूर राजेंद्र हिरावत (२६, रा. पेठ रोड, सुदर्शन कॉलनी) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार हिरावत हे घरभाडे मागण्यासाठी विखे-पाटील यांच्या घरी गेले होते. याचा राग येऊन विशाल याने हातातील चाकू व स्क्रूड्रायव्हरने त्यांच्यावर हल्ला करत मारहाण केली. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकाची आत्महत्या
नाशिक : राहत्या घरी विषारी औषध सेवन करून एकाने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि.२१) रात्री टाकळी रोड परिसरात घडली. किशोर धर्मा चव्हाण (५४, रा. गुंजग्ळे मळा, टाकळी रोड) असे या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चव्हाण यांनी रात्री विषारी औषध सेवन केले होते. त्यांच्यावर पवार मेडिकल महाविद्यालयात उपचार सुरू असताना त्यांचा काल मृत्यू झाला. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.