घरात घुसून सराईत टोळक्याचा प्राणघातक हल्ला
नाशिक : दरवाज्यास आग लावून घरात घुसलेल्या सराईतांच्या टोळक्याने तीघा भावांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना बागवानपुरात घडली. या घटनेत एकावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले असून दोघांना लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आल्याने ते जखमी झाले आहेत. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात चार जणांच्या टोळक्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अर्जुन राजू लोट, करण राजू लोट (रा.दोघे महालक्ष्मी चाळ,बागवानपुरा),कमल उर्फ बाबू रामपाल लोट व अक्षय रामपाल लोट (रा.दोघे चौपन्न कॉर्टर,कथडा) अशी घरात घुसून हल्ला करणा-या संशयीतांची नावे असून ते पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. याप्रकरणी चेतन रामकुवर बिगानिया (रा.महालक्ष्मी चाळ,बागवानपुरा) यांनी तक्रार दाखल केली आहे. संशयीत टोळक्याने जुन्या भांडणाची कुरापत काढून बिगानीया यांच्या घराच्या दरवाजावर ज्वलनशिल पदार्थ टाकून आग लावून दिली होती. मंगळवारी (दि.८) रात्री चेतन बिगानिया यांनी याबाबत जाब विचारला असता ही घटना घडली. संशयीत टोळक्याने घरात घुसून चेतन यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. यावेळी अर्जुन बिगानीया आणि राहूल बिगानिया आपल्या भावाच्या मदतीला धावून आले असता संशयीत टोळक्याने त्यांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. या घटनेत तिन्ही भाऊ जखमी झाले असून अधिक तपास उपनिरीक्षक राऊत करीत आहेत.
…….
फळविक्रे त्यांमध्ये हाणामारी
नाशिक : गाड्यासमोर गाडा लावल्याचा जाब विचारल्याने प्रतिस्पर्धी विक्रेत्याने दुस-या फळविक्रेत्यास बेदम मारहाण केल्याची घटना मानवता क्युरी हॉस्पिटलच्या परिसरात घडली. या घटनेत एका विक्रेत्यास वजनी माप मारण्यात आल्याने तो जखमी झाला असून याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुभम रामधन चौधरी – तेली असे मारहाण करणा-या संशयीत फळविक्रेत्याचे नाव आहे. याप्रकरणी विजय धनजी केवट (रा.काठेगल्ली) यांनी तक्रार दाखल केली आहे. केवट यांचा फळ विक्रीची व्यवसाय असून ते मुंबईनाका भागातील मानवता क्युरी हॉस्पिटल परिसरात आपला गाडा लावतात. बुधवारी (दि.९) दुपारच्या सुमारास ते आपला व्यवसाय सांभाळत असतांना परिसरातच फळविक्री करणा-या संशयीताने केवट यांच्या गाड्यासमोर आपला गाडा लावून गि-हाईकांना बोलावले. यावेळी केवट यांनी गाड्यासमोर का गाडा लावतो असा जाब विचारला असता संशयीताने लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करून त्याच्या डोक्यात वजनी माप मारल्याने केवट जखमी झाले असून अधिक तपास हवालदार शिंदे करीत आहेत.
……
रिक्षातील टोळक्याने दुचाकीस्वारांना लुटले
नाशिक : अॅटोरिक्षाने पाठलाग करणा-या टोळक्याने दुचाकीस्वारांना लुटल्याची घटना जत्रा हॉटेल ते नांदूर लिंकरोड भागात घडली. या घटनेत दुचाकीस्वारांना मारहाण करीत टोळक्याने सुमारे २३ हजाराचा ऐवज बळजबरीने काढून घेत पोबारा केला असून याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात जबरीलुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोशन रमेश निमसे (१९ रा.निमसे मळा, मदर तेरेसा रोड) या युवकाने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. रोशन निमसे हा युवक मंगळवारी (दि.८) आपल्या मित्रासमवेत दुचाकीवर मुंबई आग्रा महामार्गावर गेला होता. सायंकाळच्या सुमारास दोन्ही मित्र घराकडे जाण्यासाठी दुचाकीवर प्रवास करीत असतांना ही घटना घडली. जत्रा नांदूर लिंक रोडवरील पाटाने दोन्ही मित्र जात असतांना पाठीमागून भरधाव आलेल्या अॅटोरिक्षा (६४५४) मधील टोळक्याने त्यांचा पाठलाग केला. सुरेश निमसे यांच्या घरासमोर टोळक्याने दुचाकी अडवित आम्हाला काय म्हणाले रे असे म्हणून दोघा मित्रांना मारहाण केली. यावेळी संतप्त टोळक्याने दोन्ही मित्रांच्या खिशातील मोबाईल,रोकड व गळय़ातील चांदीची साखळी असा सुमारे २३ हजार २०० रूपये किमतीचा ऐवज बळजबरी काढून घेत पोबारा केला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक तोडकर करीत आहेत.
……
कारचालक तरूणीचा विनयभंग
नाशिक : मैत्रीणीस सोडण्यासाठी जाणा-या तरूणीच्या कारची काच फोडून एकाने शिवीगाळ करीत विनयभंग केल्याची घटना महामार्गावरील इंदिरानगर भुयारी मार्ग परिसरात घडली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयीतास अटक करण्यात आली आहे.
प्रतिक पवन क्षिरसागर (२३ रा.पंपीग स्टेशन,गंगापूररोड) असे अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार गंगापूररोड भागात राहणारी तरूणी मंगळवारी (दि.८) रात्री आपल्या मैत्रीणीस सोडण्यासाठी तिच्या घरी जात असतांना ही घटना घडली. क्रिएटा कारमधून दोघी मैत्रीणी प्रवास करीत असतांना इंदिरानगर बोगदा परिसरातील सर्व्हीसरोडवर पाठलाग करून आलेल्या संशयीताने कार थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र तरूणीने आपले वाहन दामटल्याने संशयीताने कारला दगड फेकून मारली. काच फुटल्याने तरूणीने जाब विचारला असता संशयीताने शिवीगाळ करीत तिचा विनयभंग केला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक साजित मन्सुरी करीत आहेत.
…….
चक्कर येवून पडल्याने एकाचा मृत्यु
नाशिक : चक्कर येवून पडल्याने पाचोरा जि.जळगाव येथील ५५ वर्षीय पादचारी व्यक्तीचा मृत्यु झाला. ही घटना महामार्ग बसस्थानक परिसरात घडली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
बाबासाहेब पंडित बोरसे (रा.हनुमानवाडी – गव्हन,ता.पाचोरा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. बोरसे सोमवारी (दि.७) सायंकाळच्या सुमारास महामार्ग बसस्थानक परिसरातील रिध्दी हॉस्पिटल समोरून पायी जात असतांना अचानक चक्कर येवून पडले होते. मुलाने त्यांना तातडीने रिध्दी हॉस्पिटल मध्ये दाखल केले असता उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यु झाला. अधिक तपास हवालदार आडके करीत आहेत.
….