नाशिक : घरात घुसून युवतीचा विनयभंग करणा-या आरोपीस अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी बी. के. गावंडे यांनी दोषी ठरवत एक वर्ष सश्रम कारवासाची शिक्षा सुनावली. राजू दिलीप खातळे (३०, रा. पाथर्डी फाटा) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अंबड परिसरात राहणा-या पिडीत युवतीच्या वडीलांचे निधन झालेले असून, ती आई व भावासमवेत राहते. आई व भाऊ २५ फेब्रुवारी २०२० रोजी कामानिमित्त घराबाहेर पडल्याची संधी साधत आरोपीने हे कृत्य केले होते. तरूणी घरात एकटी असल्याचा गैरफायदा घेत आरोपीने घरात घुसलेल्या आरोपीने तिचा हात पकडून विनयभंग केला होता. यावेळी प्रसंगावधान राखत युवतीने घराबाहेर धाव घेत दारास कडी कुलूप लावून अंबड पोलीस ठाणे गाठले होते. तरूणीने आपबिती कथन केल्याने पोलीसांनी तात्काळ तिच्या घरी जावून आरोपीला ताब्यात घेतले. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहायक पोलिस निरीक्षक गणेश शिंदे यांनी पुरावे संकलीत करून दोषारोपत्र दाखल केले. न्यायाधिश गावंडे यांच्या कोर्टात सरकारी पक्षातर्फे अॅड. विद्या देवरे-निकम यांनी युक्तीवाद केला. समोर आलेल्या साक्षी पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत एका वर्षाच्या सश्रम कारवासाची शिक्षा ठोठावली. पैरवी अधिकारी म्हणून पोलिस शिपाई रोहिणी उगले व अमित साळवे यांनी काम पाहिले.
….