घरफोडी करून परतलेल्या चोरट्यांनी सुरक्षा रक्षकाच्या घरीच भरदिवसा केली जबरीचोरी
नाशिक : घरफोडी करून परतलेल्या चोरट्यांनी भरदिवसा त्याच इमारतीतील सुरक्षा रक्षकाच्या पत्नीस चाकूचा धाक दाखवत रोकडसह दागिणे लांबविल्याची घटना जयमल्हारनगर भागात घडली. या प्रकरणी चार जणांच्या टोळक्याविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात जबरीचोरीसह घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ललीता प्रदिप मरसाळे (रा.पाम स्क्वेअर,आदित्य हॉल जवळ कैलासनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. मरसाळे दांम्पत्य पाम स्वेअर या सोसायटीत सुरक्षा रक्षक म्हणून काम पाहतात.सोसायटीच्या वतीने तळमजल्यावर त्यांना राहण्याची व्यवस्था केली आहे. गुरूवारी (दि.१८) दुपारच्या सुमारास पती कामावर गेलेले असतांना ललीता मरसाळे या लहान मुलांसोबत आपल्या घरात असतांना ही घटना घडली. २५ ते ३० वयोगटातील चार जणांच्या अज्ञात टोळक्याने अचानक त्यांच्या घरात प्रवेश केला. यावेळी संशयीतांनी मरसाळे व त्यांच्या मुलांना चाकूचा धाक दाखवत महिलेच्या गळयातील मंगळसुत्र, कानातील दागिणे तसेच मोबाईल आणि पर्स मधील दहा हजार रूपये असा सुमारे ३५ हजार रूपये किमतीचा ऐवज बळजबरीने काढून घेत पोबारा केला. टोळके पसार होताच महिलेने आरडाओरड केली असता याच इमारतीत संशयीतांनी घरफोडी केल्याचे उघड झाले. कुलकर्णी कुटूंबियांचा बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी रोकडसह सन्याचांदीचे दागिणे लांबविल्याचा अंदाज असून भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक माईनकर करीत आहेत.
———-
बेकायदा मद्यविक्री करणा-यास पोलीसांनी ठोकल्या बेड्या
नाशिक : वडाळागावात बेकायदा मद्यविक्री करणा-या एकास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. संशयीताच्या ताब्यातून प्रिन्स संत्रा नावाचा देशी दारू साठा हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अफसर उर्फ भु-या रफिक शहा (३२ रा.म्हाडा वसाहत) असे अटक केलेल्या संशयीत दारू विक्रेत्याचे नाव आहे. वडाळागावात बेकायदेशीररित्या देशी दारूची विक्री होत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी छापा टाकला असता संशयीत विनापरवाना मद्यविक्री करतांना मिळून आला. संशयीताच्या ताब्यातून देशी दारूच्या ३० बाटल्या जप्त करण्यात आल्या असून याप्रकरणी पोलीस नाईक रतन सांगळे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास जमादार पाळदे करीत आहेत.
———
जुगार अड्डा पोलीसांनी केला उदध्वस्त
नाशिक : भोसला स्कूल पाठीमागील संतकबीरनगर भागात बंदीस्त घरात सुरू असलेला जुगार अड्डा पोलीसांनी उदध्वस्त केला. या कारवाईत सात जुगारींना बेड्या ठोकत पोलीसांनी संशयीतांच्या ताब्यातील रोकड आणि जुगाराचे साहित्य असा सुमारे सात हजार रूपयांचा ऐवज हस्तगत केला. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने केली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युनिटचे कर्मचारी विशाल काठे यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. संतकबीरनगर येथील मांगीरबाबा चौकातील एका बंदीस्त घरात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती युनिट १ च्या पथकास मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छापा टाकला असता प्रसाद उत्तम घोडे (रा.मांगीरबाबा चौक) व त्याचे सहा साथीदार पत्यांच्या कॅटवर तीन पत्ती जुगार खेळतांना मिळून आले. संशयीतांच्या ताब्यातून रोकड व जुगाराचे साहित्य असा ६ हजार ८६० रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक सोळसे करीत आहेत.
————
२३ वर्षीय तरूणाने गळफास घेत केली आत्महत्या
नाशिक : लेखानगर येथील इंदिरागांधी वसाहतीत राहणा-या २३ वर्षीय तरूणाने गळफास लावून घेत आत्महत्या केली. युवकाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. प्रशांत दिलीप सुतार (रा.वसाहत क्र.१) असे आत्महत्या करणा-या तरूणाचे नाव आहे. प्रशांत सुतार याने गुरूवारी (दि.१८) सायंकाळपूर्वी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात पत्र्याच्या पोलला साडी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यु झाला. याबाबत विलास क्षिरसागर (रा.पवननगर) यांनी खबर दिल्याने पोलीस दप्तरी मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत.