जिल्हा सामान्य रुग्णालय येथील कोरोना घटना व्यवस्थापक डॉ. निखिल सैंदाणे यांनी दिली माहिती
नाशिक – जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांना योग्य उपचाराबरोबरच ऑक्सिजन वेळेत उपलब्ध होण्यासाठी नवीन २५० लिटर क्षमतेचे २७ ड्युरा सिलेंडर मागविण्यात आले आहे. ही सिलेंडर येत्या दोन ते तीन दिवसांपर्यंत ग्रामीण भागात पोहचविण्यात येतील. जम्बो सिलेंडरवर ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालय येथील कोरोना घटना व्यवस्थापक डॉ. निखील सैंदाणे यांनी एका शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
प्रसिध्दीपत्रकात नमूद केल्यानुसार, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील कोविडग्रस्त रुग्णांना योग्य उपचार मिळवेत यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी डॉ. निखील सैंदाणे यांची घटना व्यवस्थापक म्हणून नेमणूक केली आहे.त्यानुसार डॉ.सैदांणे यांनी नियोजन केले आहे.
व्हेटिंलेटर बाबत जिल्हयातील डीसीएचसी सेंटर येथे ठराविक व्हेटिंलेंटर ठेऊन त्या-त्या भागातील शासकीय तसेच खासगी भिषक यांच्या मदतीने गंभीर कोविडग्रस्त रुग्णांना उपचार देणे शक्य होणार आहे. याबरोबर जिल्ह्यातील सर्व कोविड रुग्णालयाची व शिल्लक खाटांची माहिती एकाच ठिकाणी लोकांपर्यत मिळण्याकरीता डॅशबोर्ड प्रणाली पुढील आठवडयापर्यंत कार्यान्वित होणार असल्याची माहिती डॉ. सैंदाणे यांनी दिली आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात आणखी ९० खाटा
जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कोविड रुग्णालयाचा दौरा करुन मार्गदर्शक सूचना केल्या होत्या. त्यानुसार नियोजन करुन पूर्वी असलेल्या ११० खाटांवरुन आता अतिरीक्त ९० खाटा वाढविण्यात आल्या असून कोविड कक्षाची क्षमता आता दोनशे खाटांची झाली आहे. त्यामध्ये २० खाटा या कोरोनाबाधित गर्भवती महिलांसाठी आहे. त्यामध्ये प्रसुती व शस्त्रक्रियांसाठी व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती डॉ. सैंदाणे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.