गोमांस वाहतूक दोघांना अटक
नाशिक : राज्यात बंदी असतांना गोमांस वाहतूक करणा-या दोघांना पोलीसांनी बेड्या ठोकल्या. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ट्रकचालक आणि क्लिनरला अटक करण्यात आली आहे. उड्डाणपूलावरून मालट्रक भरून जनावरांच्या मांसची वाहतूक होत असल्याची माहिती मुंबईनाका पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार गुरूवारी रात्री मुंबईनाका ओव्हर ब्रीजवर सापळा लावण्यात आला होता. भरधाव आलेल्या एमएच १५ एफव्ही ६१८८ हा आयशर ट्रक अडवून पोलीसांनी वाहन तपासणी केली असता सुमारे चार लाख रूपये किमतीचे जनावरांचे मास मिळून आले. पोलीसांनी चालक व क्लिनरला अटक केली असून त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सोमनाथ केंकजे करीत आहेत.
….
दुचाकीस्वारास भोसकले
नाशिक : मित्रांचा वाद मिटविण्यासाठी गेलेल्या दुचाकीस्वारावर टोळक्याने हल्ला करीत चाकूने भोसकल्याची घटना पंचवटीतील इंद्रकुंड भागात घडली. याघटनेत तरूण जखमी झाला असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिरूध्द राजेंद्र आंबेकर,धर्मेश प्रदिप परमार,राज प्रदिप परमार (रा.सर्व रविवार कारंजा) अशी दुचाकीस्वारावर हल्ला करणा-या संशयीत टोळक्याचे नाव आहे. याप्रकरणी शुभम संजय राजगुरू (१९ रा.येवलेकर चाळ पंचवटी कारंजा) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. राजगुरू गुरूवारी (दि.२७) सकाळच्या सुमारास दुचाकीत पेट्रोल टाकून इंद्रकुड भागातून जात असतांना ही घटना घडली. वाटेत विशाल चक्रवर्ती नामक मित्राने त्यास आवाज दिल्याने तो त्याच्याकडे गेला असता चक्रवर्तीच्या मित्रास मारहाण करणा-या संशयीतांनी त्याच्यावर हल्ला केला. यावेळी टोळक्याने त्यास लाथाबुक्यांनी मारहाण करीत संशयीत राज परमार याने त्याच्यावर चाकूने वार केला. या घटनेत राजगुरू जखमी झाला असून अधिक तपास पोलीस नाईक देवरे करीत आहेत.
…….
बजरंगवाडीत एकाची आत्महत्या
नाशिक : बजरंगवाडीत ३५ वर्षीय व्यक्तीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर इसमाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
राजू भिमा गावित (रा.बारा खोल्या नं.१ बजरंगवाडी) असे आत्महत्या करणा-या इसमाचे नाव आहे. राजू गावित याने शुक्रवारी (दि.२७) आपल्या राहत्या घरातील पाईपाला नॉयलॉन दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यु झाला. त्याच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. अधिक तपास हवालदार माळोदे करीत आहेत.
………
सिन्नरफाटा येथे तलवारधारी जेरबंद
नाशिक : सिन्नरफाटा परिसरातील उड्डाणपूलाखाली तलवार घेवून फिरणा-या एकास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. संशयीताच्या ताब्यातून तलवार आणि धारदार खंजीर हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने केली.
संजुसिंह सुरजसिंह सिकलकर (रा.व्यायामशाळा झोपडपट्टी,सिन्नरफाटा) असे संशयीताचे नाव आहे. उड्डाणपुलाखालील पादचारी मार्गावर शुक्रवारी (दि.२७) हातात तलवार घेवून फिरणारा एक तरूण दहशत माजवित असल्याची माहिती युनिट २ च्या पथकास मिळाली होती. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत संशयीतास जेरबंद केले असून त्याच्या ताब्यातून तलवार आणि धारदार खंजीर हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी युनिटचे हवालदार देवकिसन गायकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार माळोदे करीत आहेत.