नाशिक : शहरातील गावठी कट्टा खरेदी विक्री व्यवसायातील तीन जण पोलीसांच्या हाती लागले असून, त्यांच्या ताब्यातून गावठी कट्यासह दुचाकी आणि जीवंत काडतुसे असा सुमारे दीड लाखाचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. दोघा संशयीतांच्या माहितीच्या आधारे पोलीसांनी मुळ कट्टा विक्रेत्यास बेड्या ठोकल्या असून त्यांच्या अटकेने शहरात बेकायदेशीर कट्टा बाळगणा-यांच्या भांडाफोड होणार आहे. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने केली.
दर्शन उत्तम दोंदे (रा.राजवाडा,कामटवाडा), रोशन विजय जाधव (रा. अभ्युंदय बँकेजवळ,कामटवाडे) व राहूल संदिप सोनवणे (रा.फर्नांडीसवाडी,जयभवानीरोड) अशी अटक केलेल्या संशयीतांची नावे असून वरील दोघांच्या माहितीवरून सोनवणे यास अटक करण्यात आली आहे. ही कारवाई युनिटचे पोलीस नाईक विशाल काठे आणि विशाल देवरे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे करण्यात आली. अंबड लिंक रोडवरील कोकन भवन परिसरात दोन तरूण कट्टा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी (दि.१७) या भागात सापळा लावला असता दोंदे व जाधव पोलीसांच्या जाळ्यात अडकले. त्यांच्या अंगझडतीत एक पिस्तूल आणि जीवंत काडतुसे तसेच मोबाईल असा ऐवज मिळून आला. पोलीस तपासात सदरचा पिस्तूल सोनवणे याच्याकडून घेतल्याचे समोर आल्याने पोलीसांनी फर्नांडीसवाडीत धाव घेत सोनवणे यांच्या मुसक्या आवळल्या. चौकशीत त्याने पिस्तूल फेकून दिल्याची माहिती देत दुचाकीच्या सिटाखाली पिस्तोलचे मॅग्झीन आणि जीवंत काडतुसे असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलीसांनी दुचाकीसह मुद्देमाल असा सुमारे १ लाख ४४ हजार ५०० रूपये किमतीचा ऐवज हस्तगत केला आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयीतांच्या अटकेने कट्टा खरेदी विक्री व्यवसायाचा भांडाफोड होण्याची शक्यता पोलीस सुत्रांनी वर्तविली आहे. ही कारवाई निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक रघुनाथ शेगर,हवालदार रविंद्र बागुल, नाझीम पठाण,पोलीस नाईक विशाल काठे,प्रविण वाघमारे,आसिफ तांबोळी,दिलीप मोंढे,विशाल देवरे,गणेश वडजे,राम बर्डे,राहूल पालखेडे निलेश भोईर,प्रतिभा पोखरकर आदींच्या पथकाने केली.