नाशिक : मखमलाबाद रोडवरील ड्रिमकॅसल सिग्नल भागात गावठी कट्टा विक्री करण्यासाठी आलेल्या तरूणास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. संशयीताच्या ताब्यातून पिस्तूलसह जीवंत काडतुसे असा सुमारे ४० हजार ५०० रूपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने केली.
किरण सुकलाल गुंजाळ (२२ रा. गायकवाड चाळ, शनिमंदिराजवळ नवनाथनगर) असे संशयीताचे नाव आहे. ड्रिम कॅसल भागात एक तरूण पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती युनिटचे वसंत पांडव यांना मिळाली होती. त्यानुसार उपायुक्त संग्रामसिह निशाणदार,सहायक आयुक्त मोहन ठाकूर व युनिटचे निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी (दि.६) पथकाने सापळा लावला होता. चैतन्य बेकरीकडे जाणा-या एका तरूणाच्या संशयास्पद हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलीसांनी त्यास हटकले असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला.मात्र पोलीसांनी वेळीच पाठलाग करून संशयीतास बेड्या ठोकल्या. त्याच्या अंगझडतीत कमरेस गावठी कट्टा लावलेला आढळून आला असून त्यात जीवंत काडतुसे होते. संशयीतांने कट्टा विक्रीसाठी आल्याची कबुली दिली असून पोलीसांनी त्याच्या ताब्यातून पिस्तूलसह काडतुसे हस्तगत केली आहेत. याप्रकरणी पोलीस नाईक प्रविण वाघमारे यांच्या तक्रारीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगीरी सहायक निरीक्षक महेश कुलकर्णी,दिनेश खैरणार जमादार पोपट कारवाळ,विजय गवांदे हवालदार रविंद्र बागुल,वसंत पांडव,अनिल दिघोळे,येवाजी महाले,संजय मुळक,प्रविण कोकाटे,आसिफ तांबोळी,महेश साळुंखे,शांताराम महाले,मोहन देशमुख,रावजी मगर,मनोज डोंगरे,राजेंद्र लोखंडे,योगीराज गायकवाड,प्रविण वाघमारे,मोतीराम चव्हाण,फय्याज सय्यद,शिपाई निलेश भोईर,गौरव खांडरे,गणेश वडजे,राम बर्डे,प्रविण चव्हाण,प्रतिभा पोखरकर व समाधान पवार आदींच्या पथकाने केली.