नाशिक : खिडकीत हात घालून चोरी केल्यानंतर चोरट्यांनी घरासमोर पार्क केलेली कारही पळवून नेल्याची घटना सिडकोतील दौलतनगर भागात घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोविंद बाबुलाल मालविया (रा.गायत्री रो हाऊस,दौलतनगर,सिडको) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. मालविय कुटुंबिय रविवारी (दि.२७) रात्री आपल्या घरात असतांना ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी घराची खिडकी उघडी असल्याची संधी साधून चोरट्यांनी बेडरूममधील टेबलावर ठेवलेला मोबाईल आणि ड्रावर मधील दोन हजाराची रोकड चोरी केला. यावेळी भामट्यांनी घरासमोर पार्क केलेली एमएच १५ जीए ४३६८ कारही पळवून नेली. या घटनेने खळबळ उडाली असून अधिक तपास हवालदार बेंडाळे करीत आहेत.
…..
मदत करणे दुचाकीस्वारास पडले महागात
नाशिक : तरूणास मदत करणे एका मोटारसायकल स्वारास चांगलेच महागात पडले. जवळच काम असल्याचे सांगून अल्पावधीसाठी ताब्यात घेतलेली मोटारसायकल भामट्याने पळवून नेली असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवनित रमेश इंगळे (५२ रा.शिरसगाव ता. निफाड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. इंगळे गेल्या बुधवारी (दि.२३) कामानिमित्त शहरात आले होते. सायंकाळच्या सुमारास ते काठे गल्लीतील त्रिकोणी गार्डन भागात एका चहाच्या टपरीवर थांबले असता ही घटना घडली. चहा घेत असतांना २३ ते २५ वयोगटातील तरूण तेथे आला. थोड्या अंतरावर महत्वाचे काम आहे असे सांगून अनोळखी तरूणांने त्यांच्याकडे दुचाकीची मागणी केली. यावेळी इंगळे यांनी त्यांच्या एमएच १५ एफ वाय ९५०१ या दुचाकीची चावी दिली असता संशयीताने दुचाकी घेवून पोबारा केला. बराच वेळ उलटूनही तरूण दुचाकी घेवून न आल्याने इंगळे यांनी सर्वत्र शोधाशोध केली मात्र तो मिळून आला नाही. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक जाधव करीत आहेत.