जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना राष्ट्रवादी शिष्टमंडळाचे निवेदन
नाशिक- केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल पाठोपाठ खतांच्या किंमती भरमसाठ वाढविल्या असून शेतकऱ्यांना मेटाकुटीला आणले आहे. खतांच्या किंमती वाढल्याने अन्न धान्यांच्या किंमती वाढणार असून खतांची दरवाढ रोखण्यात यावी असे निवेदन शहाराध्यक्ष रंजन ठाकरे, दिंडोरी लोकसभा अध्यक्ष ऍड. रविंद्र पगार, नाशिक लोकसभा अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड व शहर सरचिटणीस संजय खैरनार यांच्यासह शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना दिले.
यंदा मान्सून लवकर सुरू होणार असल्याचे हवामान खात्याने कळविले असून शेतकरी वर्ग शेती मशागतीच्या तयारीला लागला आहे. खरीप हंगामास सुरवात झाली असल्याने शेतकरी बी-बियाणे व खत खरेदी करू लागला आहे. परंतु केंद्र सरकारने शेतकरी वर्गावर मुद्दाम अन्याय करत खतांच्या किंमतीत अवाजवी वाढ केली आहे. भारतात पेट्रोलच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. शंभर रुपयांच्यावर पेट्रोलचे दर गेलेले आहेत. यात केंद्र सरकारने खतांच्या किमती वाढविल्याने साहजिक अन्न धान्यांच्या किमती वाढणार असून सर्वसामान्यांचे जीवन जगणे मुश्किल होणार आहे. १०.२६.२६ ची किंमती ६०० रुपयांनी वाढली असून डिएपीची किंमत जवळपास ७१५ रुपयांनी वाढली आहे. शेत मालाला हमीभाव मिळत नसताना खतांच्या किमतीत वाढ करून केंद्र सरकारने तुघलकी निर्णय घेतला आहे.भारत कृषिप्रधान देश असताना केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या जीवावर उठले आहे. खतांच्या किमती वाढवून तेच पैसे शेतकर्यांच्या खात्यात टाकण्याचे गाजर जनतेला दाखविले जात आहे. कोरोनामुळे देशातील शेतकरी आधीच अडचणीत असताना खतांची दरवाढ करून भाजपशासित केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.
कोणत्याही परिस्थितीमध्ये पेट्रोल, डिझेलसह खतांच्या किमती कमी झाल्या पाहिजे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी अनिता भामरे, पुरुषोत्तम कडलग, अंबादास खैरे, महेश भामरे, मनोहर कोरडे, गणेश गायधनी, जीवन रायते आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.