नाशिक – एकाच कारखान्यात काम करणा-या दोघांनी आपल्या सहकारी कामगारांना चांगलेच गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. या भामट्यांनी विविध कारणे सांगून अन्य कामगारांकडून क्रेडिट कार्डच्या माध्यमातून हातऊसनवार रोकड घेवून पोबारा केल्याने ही घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात साडे सहा लाखास संशयीतांनी फसविल्याचे समोर आले असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविंद्र रमेश गादेकर आणि निंबा लक्ष्मण लांडगे अशी संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी प्रदिप कासार (रा.सावतानगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. संशयीत आणि तक्रारदार एकाच कारखान्यातील कामगार असून त्यांनी हात ऊसनवारीच्या नावाखाली तक्रारदार कामगारांच्या क्रेडिट कार्डचा वापर करून लाखांना गंडविले आहे. औद्योगीक वसाहतीतील डब्ल्यू ८२ या प्लॉटवरील एका नामांकित कारखान्यात संशयीत आणि तक्रारदार कामगार काम करीत होते. या कारखान्यात कामगारांना चांगले वेतन असल्याने एसबीआय बँकेच्या वतीने त्यांना डेबीट आणि क्रेडिट कार्ड वितरीत करण्यात आले आहेत. एकत्रीत काम करीत असल्याने सुख दुखात कामगारांमध्ये हात उसनवार रकमाचा व्यवहार होता. त्यातूनच ही घटना घडली. संशयीतांनी गेल्या वर्ष भरापासून तक्रारदारासह महिला कामगार आणि अन्य कामगारांना विविध अडचणींचा पाढा वाचून क्रेडिट कार्डच्या माध्यमातून वेळोवेळी लाखोंच्या रकमा उचलल्या. आज देवू उद्या देवू असे करत त्यांनी वेळ मारून नेली. मात्र लॉकडाऊन नंतर दोघाही भामट्यांनी पोबारा केल्याने ही घटना उघडकीस आली. एकाने राजीनामा दिला तर दुस-याने कारखान्यात येणे बंद केल्याने ऊसनवार पैसे देणा-या कामगारांनी त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून सध्या पाच कामगार तक्रार देण्यास पुढे धजावले आहे. संशयीतांनी या कामगारांना तब्बल साडे सहा लाख रूपयांना गंडविले असून अन्य कामगारांचीही फसवणुक झाल्याची चर्चा कारखाना आवारात आहे. अधिक तपास उपनिरीक्षक शेवाळे करीत आहेत.