वाहन चोरीचे प्रमाण वाढले, रिक्षासह दोन मोटारसायकलची चोरी
नाशिक – शहरातून रिक्षासह दोन मोटारसायकली चोरीला गेल्याच्या दोन घटना बुधवारी घडल्या. या प्रकरणी सबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. पंचवटीतील अवधुतवाडी येथून अविनाश पंढरीनाथ मोहिते (वय ३३, रा. विहितगाव, बागुल नगर) यांची रिक्षा क्र. (एमएच १५ एके ५४१५) चोरीला गेली. सोमवार (दि. ९) नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास मोहिते यांनी त्यांची रिक्षा अवधुतवाडी येथील सप्तश्रृंगी मंदिराच्या बाजूला पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने ही रिक्षा चोरून नेली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोटारसायकल चोरीची पहिली घटना पंचवटीतील सहारा हॉस्पिटल परिसरात घडली. भगवान कैलास खांदवे (३८, रा. पिंपळनारे, ता. दिंडोरी) यांनी त्यांची मोटारसायकल क्र. (एमएच १५ बीएस ३५९४) ही ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजेदरम्यान सहारा हॉस्पिटलच्या पाठिमागे पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने ही मोटारसायकल चोरून नेली.
तर दुस-या घटनेत मौलाना आजाद रोड, देवळाली गाव येथून देखील अॅक्टीवा चोरीला गेली. याप्रकरणी कमलाकर देविदास विसपुते (रा. पंजाबी वाडा, मौलाना आजाद रोड, देवळाली गाव) यांनी उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
……
रामवाडी पुलाजवळील सोनसाखळी लांबवली
सकाळी आठ वाजेच्या सुमारास रामवाडी पुलाजवळील सुलभ शौचालयासमोर चक्कर येऊन पडलेल्या व्यक्तीच्या गळ्यातील सोन्याची चेन तीन संशयितांनी लंपास केल्याची घटना मंगळवार घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव कुटे दुध वाटप करून घराच्या दिशेने जात होते. ते रामवाडी पुलाजवळील सुलभ शौचालयासमोर आले असताना त्यांना चक्कर आली. त्यावेळी अनोळखी तीनजण मदतीच्या बहाण्याने त्यांच्याजवळ आले. त्यानंतर तिघांनी त्यांच्या गळ्यातील ५० हजार रुपये किंमतीची तीन तोळे वजनाची सोन्याची चेन लंपास केली. पुढील तपास पोलीस हवालदार सी. डी. बोडके तपास करत आहेत. सकाळी आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पंपिंग स्टेशन गंगापूररोड येथील गौरव शरद कुटे (वय ३२) यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार सी. डी. बोडके तपास करत आहेत.
…….
मद्यपींकडून एकाला मारहाण
नाशिक : दहा रुपये देण्यास नकार दिल्याचा दोन मद्यपींनी एकास मारहाण केल्याची घटना कालिकानगर, पंचवटी परिसरात बुधवारी (दि. ११) घडली. याप्रकरणी सम्राटनगर, दिंडोरी रोड येथील संतोष पूनम सकट (वय ३३) यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सकट यांनी तक्रारीत म्हटले आहे की, दोघांना दहा रुपये देण्यास नकार देत तुम्ही दारू पिलेले आहात, घरी निघू जा, असे सांगितले. राग अनावर झाल्याने दोघांनी त्यांना मारहाण केली. त्यात ते जखमी झाले. पोलिसांनी संशयिता विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ए. एम. चौधरी करत आहेत.
……
थकीत गाळ्याचे भाडे मागणार्यावर चाकूहल्ला
नाशिक : गाळ्याचे चार महिने थकीत भाडे मागितल्याच्या कारणाने एकाने गाळामालकावर चाकूहल्ला केल्याची घटना बुधवारी (दि.११) दुपारी २ वाजे दरम्यान कोणार्कनगर परिसरात घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दगा खैरनार गाळ्याचे भाडे मागण्यासाठी संशयित गणेश अनिल बुरकुल यांच्याकडे गेले. त्यावेळी त्याने खैरनार यांना जीवंत सोडणार नाही, अशी धमकी देत त्यांच्या गळ्यावर व हाताच्या तळव्यावर चाकूने वार केले. तसेच डोक्यावर लोखंडी तवा मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यात ते जखमी झाले. याप्रकरणी धर्मात्मा बंगला, कोणार्कनगर रोड येथील सोपान दगा खैरनार (वय ४४) यांनी आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी संशयित वृंदावननगर, नांदूर-जत्रा रोड येथील गणेश अनिल बुरकुल (वय ३३) याच्यावर गुन्हा दाखल केला. दगा धर्मा खैरनार असे जखमीचे नाव आहे. पुढील पोलीस उपनिरीक्षक चांदणी-पाटील करत आहेत.