बिटमार्शलला शिवीगाळ दोघे गजाआड
नाशिक : पेट्रोलिंग करणा-या बिटमार्शलांची गच्ची पकडून शिवीगाळ करणा-या दोघांना पोलीसांनी बेड्या ठोकल्या. संशयास्पद हालचाली आढळून आल्याने दोघांना विचारपूस केल्याने हा वाद झाला होता. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात शासकिय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान टवाळखोरांची मजल खाकीवर हात उचलण्यापर्यंत गेल्याने पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आकाश गोविंद राठोड (२२) व तुषार रविंद्र सावंत (१९ रा.गणेश मार्केट कोणार्क नगर) अशी पोलीसांना शिवीगाळ करणा-या संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई प्रफुल्ल रत्नाकर वाघमारे यांनी तक्रार दाखल केली आहे. आडगाव पोलीस ठाण्याचे बिट मार्शल असलेले वाघमारे व त्यांचे सहकारी गुरूवारी (दि.२४) रात्री वृंदावननगर भागात पेट्रोलींग करीत असतांना ही घटना घडली. वृंदावन नगर येथील जगन्नाथ अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये दोघे संशयीत संशयास्पद उभे असल्याने पोलीसांनी त्यांना विचारपूस केली असता हा प्रकार घडला. संतप्त झालेल्या दोघांनी पोलीसांची गच्ची पकडत खाकीवर हात उचलला. तसेच शिवीगाळ व धक्काबुक्की करीत पोबारा केला. या घटनेची दखल घेत पोलीसांनी दोघांना रात्रीच हुडकून काढत बेड्या ठोकल्या असून अधिक तपास उपनिरीक्षक घाडगे करीत आहेत.
…..
दोन मोटारसायकली चोरी
नाशिक : शहरात मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच असून नुकत्याच दोन दुचाकी चोरट्यांनी पळवून नेल्या. याप्रकरणी आडगाव आणि पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एकलहरा रोडवरील नेहे मळयात राहणारे श्याम बाळू नेहे गेल्या बुधवारी (दि.२३) शिलापूर येथे गेले होते. भगवती इलेक्ट्रीक दुकानासमोर त्यांनी पार्क केलेली त्यांची एमएच १५ सीडब्ल्यू ७६५२ ही मोटारसायकल चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार शिंदे करीत आहेत. दुसरी घटना निमाणी बसस्थानक परिसरात घडली. राजीवनगर येथील किशोर रामचंद्र गरड यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. गरड शुक्रवारी (दि.१८) निमाणी बसस्थानक परिसरात गेले होते. सुर्या हॉस्पिटल भागातील स्टाप पॅथोलॉजी लॅब समोर पार्क केलेली त्यांची मोटारसायकल एमएच १९ एन २९११ चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार झाडे करीत आहेत.
…..
टोळक्याकडून दुचाकीस्वारास मारहाण
नाशिक : दुचाकी अडवित चार जणांच्या टोळक्याने चालकास लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना सावरकर नगर भागात घडली. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्षय पाटील,अक्षय भारती,मुकेश मगर आणि कुणाल चव्हाण अशी दुचाकीस्वारास मारहाण करणा-या संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी सौरव रूपचंद जगताप (रा.महालक्ष्मीचौक,महादेवनगर) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. जगताप बुधवारी (दि.२३) रात्री आपल्या दुचाकीवरून घराकडे जाण्यासाठी प्रवास करीत असतांना ही घटना घडली. संगम बार समोरील रोडवर पाठीमागून दोन दुचाकींवर आलेल्या संशयीतांनी जगताप यांची मोटारसायकल आडवून कारण नसतांना शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने मारहाण केली. यावेळी संशयीतांनी पोलीसात गेला तर जीवे ठार मारू अशी धमकी दिली. अधिक तपास हवालदार देवरे करीत आहेत.
……..
नोटप्रेसमधून विद्यूत पंप चोरी
नाशिक : नोटप्रेस आवारातील विहीरीवर असलेली विद्यूत मोटार चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना मंगळवारी (दि.२४) घडली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून नोटप्रेसच्या सुरक्षा यंत्रणेला चोरट्यांनी आवाहन दिल्याने खळबळ उडाली आहे.
संजय शंकर बालमिकी (रा.पाथर्डी रोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. नेहरूनगर येथील नोटप्रेसमध्ये बालमिकी सेवेत असून मंगळवारी सकाळी ते मोटार सुरू करण्यासाठी आवारातील विहीरीवर गेले असता ही घटना निदर्शनास आली. अज्ञात चोरट्यांनी घाण पाण्याच्या विहीरीवर असलेली सुमारे सात हजार रूपये किमतीची मोटार चोरून नेली. अधिक तपास हवालदार शिंदे करीत आहेत.
……
कामटवाड्यात ९० हजाराची घरफोडी
नाशिक : कामटवाडा परिसरातील अभियंतानगर भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ९० हजाराच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात ७० हजाराच्या रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजय शंकर पगारे (रा.पेठेनगर रोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पगारे यांचे सासरे अभियंतानगर भागात राहतात. सासरकडील मंडळी बाहेरगावी गेल्याची संधी साधत चोरट्यांनी हा डल्ला मारला. अज्ञात चोरट्यांनी सास-यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेड रूममधील लोखंडी कपाटात ठेवललेली रोकड आणि सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ८८ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक कोल्हे करीत आहेत.
……
बनावट व्यक्ती उभा करुन फसवणूक
नाशिक : मृत व्यक्तीच्या नावे बनावट व्यक्ती उभा करुन सह निबंधक कार्यालयात जमीनीचे दस्तनोंदणीतून फसवणूकीचा प्रकार उजेडात आला आहे. याप्रकरणी नाशिकचे सहायक दुय्यम निबंधक अन्वर शेखलाल पिरजादे (वय ५४, दुय्यम निबंधक) यांच्या फियार्दीवरुन मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दुय्यम निबंधक पिरजादे यांच्या तक्रारीनुसार प्रफूल कैलास आहेर रामचंद्रनगरी, सुशीलनगर पंचवटी याने २० डिसेंबर २०१८ ला पिनॅकल मॉल येथील दुय्यम निबंधक वर्ग दोन या कार्यालयात भाईदास भारोटे हे २१ फेब्रूवारी २००४ ला मृत झालेल्या व्यक्तीच्या नावाने दुय्यम निबंधकांपुढे बनावट व्यक्ती उभा करुन म्हसरुळ (ता.जि.नाशिक) येथील सर्व्हे क्रमांक २३८,२,४ या प्लाटपैकी १६२.७५ चौरस मीटर मिळकतीचा खोटे दस्त बनविले. मृत व्यक्तीच्या नावाने बनावट दस्त बनवित शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
……
रिक्षा भाडे मागितल्यावरुन एकाला मारहाण
नाशिक – मखमलाबाद गावात रिक्षाचे भाडे मागितले म्हणून दोघांनी एकाला बेदम मारहाण केली. रविवारी (दि.२०) सायंकाळी रिक्षा थांब्यावर हा प्रकार घडला. याप्रकरणी म्हसरुळ पोलिस ठाण्यात रिक्षाचालक शरद रामदास पवार (वय ३४, फुलेनगर पेठ रोड) यांच्या फियार्दीवरुन गुन्हा दाखल झाला आहे. शरद पवार यांच्या तक्रारीनुसार त्यांनी त्यांचा परिचित हरि बेंडकुळे (वय ३६, रामवाडी पंचवटी) यांच्याकडे रिक्षाचे भाडे मागितले. त्यावरुन चिडलेल्या हरि बेंडकुळे व संदीप बेंडकुळे यांनी मारहाण केली. याप्रकरणी म्हसरुळ ठाण्यात गुन्हा दाखल असून हवालदार पठाण तपास करीत आहेत.